Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामगार भरतीच्या परीक्षेला प्रश्‍न विचारणार राजकारणावर!

कामगार भरतीच्या परीक्षेला प्रश्‍न विचारणार राजकारणावर!

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:34AMमुंबई : राजेश सावंत

स्मशानभूमीत लाकडे रचण्यासह हमालगिरीसाठी पालिकेने कामगार भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा होणार असून यात पर्यावरण अभ्यास, भारतीय व्यापार, भारतीय संस्कृती एवढेच नाही तर चालू घडामोडींवर प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे ही भरती कामगारांचीच आहे का ? असा प्रश्न बेरोजगार उमेदवारांना पडला आहे.

मुंबई महापालिकेत कामगार, कक्षपरीक्षक, श्रमिक, हमाल, स्मशानभूमी कामगार, आया आदी ड वर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. 11 डिसेंबर 2017 ला जाहिरात काढून, याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पदांसाठी 15 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. 100 गुण असलेल्या या परीक्षेत मराठी भाषेसाठी 40 गुण, इंग्रजी भाषा 10 गुण, सामान्य ज्ञान 25 गुण व अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 गुण ठेवण्यात येणार असल्याचे समजते. 

सामान्य ज्ञान परीक्षेत भारतीय इतिहास - प्राचीन मध्यमयुगीन काळ, भारतीय राष्ट्रीय चळवळ, भारतीय भूगोल यात नद्या, पर्वत, माती, हद्द, नैसर्गिक स्त्रोत, शेती, लोकसंख्या, उद्योग यावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर, भारतीय राजकारण, संविधान आणि संसद, भारतीय व्यापार, पर्यावरण अभ्यास, भारतीत संस्कृती, खेळ व चालू घडामोडींवरही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 

अंकगणितात संख्या प्रणाली, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, नफा व तोटा, सरळव्याज व चक्रवाढव्याज, मराठीत शब्दांची रूपे, मराठी वाक्यरचना आदींवरही प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे समजते. तशी प्रश्नावली तयार करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. याचा कामगार भरतीशी काहीच संबध नाही, असे मत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.