Fri, Feb 22, 2019 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात नगरसेविकेचे पद रद्द; पोटनिवडणूक लागणार

उल्हासनगरात नगरसेविकेचे पद रद्द; पोटनिवडणूक लागणार

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 1:05AMउल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 1 मधून अनुसूचित जमात या आरक्षणावर निवडून आलेल्या पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याचा आदेश पालिका आयुक्‍तांना प्राप्‍त झाला आहे. या आदेशाच्या बळावर पालिका आयुक्‍त गणेश पाटील यांनी पूजा भोईर यांचे नगरसेवक रद्द केल्याने लवकरच या प्रभागात पोटनिवडणूक लागणार आहे.

त्यांनी पराभूत केलेले शिवसेनेचे उमेदवार केशव ओवळेकर यांनी भोईर यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन कोकण भवन येथील जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. पूजा भोईर यांची जात हिंदू कोळी असून त्यांनी जात प्रमाणपत्र हे महादेव कोळी असल्याचे मिळवले होते. 

भोईर यांचे वडील किशोर भोकरे, त्यांचे चुलत काका विजय भोकरे, त्यांच्या बहिणी यांच्या शाळेत प्रवेश घेतानाच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळून आली. तर समितीसमोर सुनावणीत भोईर यांची जात महादेव कोळी असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. 

समितीने पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचे आदेश पालिका आयुक्‍तांना दिले. या आदेशाची प्रत प्राप्‍त होताच तत्कालीन आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर यांनी पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. तर समितीच्या आदेशांविरोधात वकील आर. के. मेंडाळकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्याने प्रक्रिया थांबली होती. अखेर सोमवारी आयुक्‍त गणेश पाटील यांनी नगरसेवक रद्द केल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले. यामुळे भाजपचे संख्याबळ 31 वर आले आहे.