Sun, May 26, 2019 21:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार विदेशातच ठरला!

मंत्रिमंडळ विस्तार विदेशातच ठरला!

Published On: Jun 19 2018 1:44AM | Last Updated: Jun 19 2018 1:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कोणाला मंत्री करायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून विचार करून आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार निश्‍चित होईल, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. नागपूर येथे 4 जुलैपासून पावसाळी अधिवेेशन सुरू होत असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. मुनगंटीवार यांनीही तसे संकेत दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौर्‍यावर जाताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर करण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार काही महामंडळाच्या घोषणा करण्यात आल्या. सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनाही राज्यमंत्र्याचा दर्जा बहाल करण्यात आला. आता अन्य महामंडळांच्या पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. काही महामंडळांच्या घोषणा झाल्या आहेत. उर्वरित महामंडळाच्या घोषणाही लवकरच होतील, असे ते म्हणाले. 

भाजपची कोअर टीम आणि मित्रपक्षांशी चर्चा करून  मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णयही योग्य वेळी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेले काही महिने सुरू आहे. मात्र, ही चर्चा कायमच फोल ठरली. मात्र, यावेळी  अधिवेशनापूर्वी विस्तार करण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत.