Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरपर्यंत

मंत्रिमंडळ विस्तार महिनाअखेरपर्यंत

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:57AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार जूनअखेरीस होणार असून या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही काही फेरबदल अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप काही नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यात  आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी निश्‍चित मानली जात आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमंत्री म्हणूनही बढती देण्यात येणार असल्याची चर्चा असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता आहे. 

गेली अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. मात्र, आता 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार हे निश्‍चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौर्‍यावर आहेत. ते 16 जूनला दौर्‍याहून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग येणार आहे. शक्यतो 25 ते 28 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूतर्र् निघण्याची शक्यता आहे. 

एकनाथ खडसे यांना जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली. त्यांच्याकडील खाती ही अन्य मंत्र्यांमध्ये विभागून देण्यात आली आहेत. कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे आकस्मात निधन झाल्याने त्यांचे खातेही रिक्त झाले आहे. शिवाय भाजपच्या कोट्यातील काही मंत्रीपदे रिक्त  आहेत. ही रिक्तपदे भरताना नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात येणार आहे. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर बुलडाण्यातून आमदार डॉ. संजय कुटे आणि चैनसुख संचेती हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, संचेती यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्याने डॉ. कुटे यांचे मार्ग मोकळा झाला आहे. 

एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्‍लीनचिट दिली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याबाबतही उत्सुकता आहे. खडसे यांनी आपल्याला आता मंत्रीपदात रस नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, मंत्रिपदावरून काढण्यात आल्याने नाराज असलेले खडसे विस्तारामध्ये नंबर लागला नाही तर शांत बसतील का? याबाबत भाजपमध्येच शंका आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे देखील मंत्रीपदाची सातत्याने मागणी करीत आहेत.राज्य सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून काही मंत्री हे निष्क्रिय ठरले आहेत. या मंत्र्यांना डच्चू देऊन पक्ष कार्याला लावले जाणार असल्याची चर्चाही भाजपमध्ये आहे. त्याचवेळी काही राज्यमंत्र्यांना बढती देऊन त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. 

शिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे विधान परिषदेचे तिकीट कापले आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन अन्य नेत्याला शिवसेना संधी देऊ शकते. कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले असून डॉ. दीपक सावंत यांची जागा हातकणंगलेचे  आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे घेतील, अशीही चर्चा आहे.