Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच

मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा थांबली असून विस्तार पुन्हा लांबणीवर पडला आहे. राज्यात सध्या लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार असून हे अधिवेशन होईपर्यंत तरी विस्तार होणार नसल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोबतच महामंडळावरील नियुक्त्याही करण्याची तयारी भाजपने केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा उठलेला धुरळा पुन्हा एकदा खाली बसला आहे. त्यामुळे इच्छुकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. तर, खाते जाण्याची भीती असलेल्या मंत्र्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. 

सध्या पालघर आणि भंडारा, गोंदीया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाणार्‍या सहा जागांच्याही निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या अन्य मंत्र्यांवरही या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर 4 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या राजकीय परिस्थितीमुळे विस्तार लांबला असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी एसीबीने क्‍लीनचिट दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाचा निकाल प्रलंबित आहे. मात्र, एसीबीच्या क्‍लीनचिटमुळे एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात पुनरागमनाचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. त्यांनी आपण मंत्री होणार नसल्याचे म्हटले असले तरी विस्तारावेळी खडसे यांचा विचार पक्षाला करावा लागणार आहे. विस्तारात त्यांना टाळल्यास कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणखीनच अवघड झाल्याचे समजते.