Mon, Mar 18, 2019 19:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे स्थानकाच्या विस्ताराचा मार्ग अखेर मनोरुग्णालयातूनच

ठाणे स्थानकाच्या विस्ताराचा मार्ग अखेर मनोरुग्णालयातूनच

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 1:21AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे रखडलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेली मनोरुग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. याबदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर मिळणार असून त्याद्वारे मनोरुग्णालयाचा पुनर्विकास होणार आहे. 

यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास 1चे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि ठाणे महापालिका आयुक्त यांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंडदरम्यान मनोरुग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय लावून धरला होता. 

दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही सदर जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांमध्ये या प्रकल्पापुढील अनेक अडचणी दूर करण्यात यश आले. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन महापालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली.

या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाची जागा मिळणे, हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. मंत्रिमंडळाने आरोग्य विभागाची जागा देण्यास मंजुरी दिल्यामुळे मोठा टप्पा पार पडला आहे. ठाणे महापालिका या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.