Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त

मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 10 2018 11:03PMमुंबई : खास प्रतिनिधी

गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. या आठवडाभरात महामंडळांच्या नियुक्त्या आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असून, सेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना नारळ दिला जाईल, असे म्हणतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅनडा आणि अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, ते परतताच विस्ताराच्या हालचालींना वेग येईल, अशी चर्चा आहे. पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कृषी खात्याचा कारभार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांच्या रिक्‍त जागी बुलडाणा जिल्ह्यातील आ. डॉ. संजय कुटे किंवा चैनसुख संचेती यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा आहे. 

पालघरच्या पोटनिवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेटपदावर बढती देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे. फडणवीस मंत्रिमंडळाचा या आधीचा विस्तार दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर विस्ताराच्या बातम्या नेहमीच येत होत्या. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होते. मात्र, यावेळी हा विस्तार नक्‍की होईल, असे सांगण्यात येत आहे.

राज्याच्या महामंडळांवरील नेमणुका अजून झालेल्या नाहीत. या नेमणुकांकडे डोळे लावून बसलेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे. गेल्या साडेतीन वषा्रंपासून या नेमणुका होणार असे सांगितले जाते. मात्र, ते प्रत्यक्षात आलेले नाही.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील अन्य नेत्यांशी चर्चा करून या नेमणुकांना हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी येत्या 25 जूनला निवडणूक होत असून, तिचा निकाल लागताच विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची मंत्रिमंडळातूनही गच्छंती होण्याची शक्यता असून, त्यांच्याजागी अन्य नेत्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.