Sat, Sep 22, 2018 10:42



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात डावे नावापुरतेच शिल्लक : देवेंद्र फडणवीस

देशात डावे नावापुरतेच शिल्लक : देवेंद्र फडणवीस

Published On: Mar 04 2018 3:01PM | Last Updated: Mar 04 2018 3:01PM



मुंबई : खास प्रतिनीधी

त्रिपुरा आणि नागालँड या पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असून आता देशात डावे हे केवळ नावालाच शिल्लक राहीले आहेत, आणि काँग्रेसने तर केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा टोमणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमीत शहा यांच्यासह पूर्वोत्तर भारतातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. 

भाजपाच्या नेत्रदिपक यशाबद्दल महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? असा प्रश्‍न आम्ही गंमतीने विचारत असू, पण त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यात या निवडणुकीत भाजपला ४९ ते ५० टक्के मतदान झाले आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्‍वास दाखवला त्यामुळे हा विजय मिळाला, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रातील आधीच्या सरकारने या भागाकडे प्रचंड दुर्लक्ष केले होते. सीमेवरील या राज्यांकडे पूर्वीच्या केंद्र सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले होते. वन, खनिज संपत्तीने समृध्द असलेली ही राज्ये देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने पंतप्रधानांनी पहिल्यांदाच अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार करूनब त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना निर्माण करण्यात मोदींना यश आले, त्यांचा विकासाचा मंत्र आणि अमित शाह यांचे कुशल संघटन कौशल्य यामुळेच अनेक कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हा केवळ ट्रेलर असून आता आगामी कर्नाटकातही भाजपचेच सरकार येईल, तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भाजपच बहुमताने विजयी होईल, असे भाकित त्यांनी वर्तविले. महाराष्ट्राच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे उत्तर त्यांनी एका प्रश्‍नाला देताना विरोधक विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे काम करीत असले, तरी त्यास जनतेकडून बॅलेटमधून उत्तर दिले जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पूर्वोत्तर राज्यांतील भाजपच्या विजयाचे हिरो सुनील देवधर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देवधरांनी गेली दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. पुस्तकाच्या रुपात चार्जशीट दाखल करून मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा चांगुलपणाचा बुरखा फाडला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनिल देवधर यांचे कौतुक केले.