Mon, Aug 19, 2019 18:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएमसाहेब फेसबुकवरचा विकृत प्रचार थांबवा : मुंडे

सीएमसाहेब फेसबुकवरचा विकृत प्रचार थांबवा : मुंडे

Published On: Jan 04 2018 3:38PM | Last Updated: Jan 04 2018 3:38PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून विरोधी पक्षांबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अतिशय विकृत प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या अकाऊंटवरून चालणाऱ्या या प्रकाराला मुख्यमंत्र्यांची संमतीआहे का? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांची या प्रकाराला संमती नसेल तर, या अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली. रस्त्यावरच्या खड्यांचे फोटो फेसबुकवर टाकले म्हणून कारवाई करणारे सायबर सेलचे पोलिस अधिकारी आता झोपा काढत आहेत  का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील विद्यमान परिस्थितीबाबत 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर पोस्ट केल्या जात आहेत. या बदनामीकारक पोस्टला आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून, सरकारचा आपले अपयश झाकण्याचा आणि जातीयवादी शक्तींना पाठिशी घालण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर शरद पवार यांनीच सर्वांत प्रथम शांततेचे आवाहन केले होते.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मिडीयावरुन अफवा पसरविल्यास कारवाई करण्याच्या घोषणा करतात आणि त्यांच्याच नावाने चालणाऱ्या पेज आणि अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट होतात, याचा अर्थ काय? अकाऊंट चालवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? आणि तो नसेल तर त्यांनी या खात्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. अकाऊंटवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काही परिस्थिती उद्भवल्यास त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशाराही त्यांनी दिला आहे.