Wed, Jun 26, 2019 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published On: Apr 18 2018 12:37PM | Last Updated: Apr 18 2018 1:18PMमुंबई : खास प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या निकषांनुसार महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यभर 60 लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता त्यांचा वापर करण्यासाठी नागरिकांना उद्युक्‍त करण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात शौचालये बांधण्याचे काम हाती घेतले गेले होते आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा मिशन मोडवर काम करीत होती, त्यामुळेच राज्य हागणदारीमुक्‍त होऊ शकले, असे फडणवीस म्हणाले. 

2012 मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार राज्यात केवळ 45 टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बाकीच्या  55 टक्के कुटुंबांसाठी शौचालये बांधण्याचे आव्हान होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसह सहकारी मंत्र्यांनी नवनवीन कल्पना राबवल्या आणि उद्दिष्ट साध्य  केले. प्रगतिपथावर असताना राज्यातल्या 55 टक्के आणि देशातल्या 50 टक्के नागरिकांकडे शौचालयाची सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्‍त करण्याचे जाहीर केले. मात्र, महाराष्ट्राने त्याआधी दीड वर्षे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात 60 लाख 41 हजार 138 शौचालये बांधण्यात आली असून, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने चार हजार कोटींहून अधिक खर्च केला आहे. विविध जिल्ह्यांत उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून तेथील प्रशासकीय यंत्रणेने ही शौचालये बांधली आहेत. पहिल्या टप्प्यात शौचालय बांधून प्रत्येकाला शौचालयाचा अ‍ॅक्सेस मिळवून देण्यात आला आहे. आता दुसर्‍या टप्प्यात प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, याबाबत जागृती करावी लागेल. शौचालय नसल्यामुळे स्त्रियांची होणारी कुचंबणा आता थांबेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी केली.  लोकांनी शौचालयाचा वापर करावा, यासाठी गावा-गावांतून खास पथके निर्माण करण्यात येणार आहेत.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.

Tags : CM, Devendra Ffadanvis, Press Conference,