Mon, Apr 22, 2019 23:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोंढाणा धरणाचे पाप राष्ट्रवादीचेच : मुख्यमंत्री

कोंढाणा धरणाचे पाप राष्ट्रवादीचेच : मुख्यमंत्री

Published On: Feb 05 2018 9:58AM | Last Updated: Feb 05 2018 9:58AMकर्जत : हेमंत देशमुख

कर्जतचे कोंढाणा धरणाचे काम बंद पडण्यास राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचारच जबाबदार असून राष्ट्रवादीने सत्तेला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून प्रचंड लूट केली, कर्जतचा पाणीप्रश्‍न जो निर्माण झाला आहे, त्यामागे राष्ट्रवादीचेच पाप आहे.  भ्रष्टाचाराचे दुसरे नाव म्हणजेच राष्ट्रवादी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कर्जतमध्ये टीकेचा घणाघात सोडला.

ते म्हणाले, सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीला शेतकर्‍यांच्या स्वामिनाथन आयोगाची आठवण झाली. मग शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना का आठवण झाली नाही? राष्ट्रवादीने शेतकरी, गोरगरीब, दीनदुबळ्या, ओबीसी जनतेची घोर फसवणूक केली आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे महापाप यांनीच केले असून, जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला आता सत्तेपासून अनेक वर्षे दूर रहावे लागणार आहे. राष्ट्रवादीची अवस्था ‘जल बिना मछली’ अशी
झाली असल्याने ते तडफडत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कर्जत दहिवली मार्केट यार्ड येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता भाजप कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्‍न पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, आ. किसान कथोरे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, आ. बाळा भेगडे , अमित साटम , आ. प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचा भाजप प्रवेश करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचे पक्षात शाल, श्रीफळ देऊन स्वागत करत एका देवेंद्रच्या मदतीला दुसरा देवेंद्र आला असून या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. देवेंद्र साटम यांनी यावेळी कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आठवडाभरातच प्रयत्न सुरू करण्यात येईल, असे जाहीर आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच बुडीत पेण अर्बन बँकेमुळे खातेदारांचे जे पैसे बुडाले आहेत, त्याची रिकव्हरी करण्यासाठी बँकेची नैना प्रकल्पात येणारी जागा सिडकोने ताब्यात घेऊन त्या माध्यमातून पैसे वसूल करून खातेदारांचे पैसे परत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच कर्जत तालुक्यातील पेज आणि चिल्हार नदीजोड प्रकल्प व्यवहार्य असल्यास त्याचाही विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या पक्ष सोहळ्यात शिवसेना, शेकापसह अनेकांनी प्रवेश केला. यावेळी दीपक बेहरे, सुनील गोगटे, अशोक ओसवाल, बिनिता घुरे उपस्थित होते.

कर्जतकरांना मुख्यमंत्र्यांचा शब्द...

कर्जत-पनवेल रेल्वे सुरू करण्यासाठी आठवडाभरातच प्रयत्न सुरू करणार, पेण अर्बन बँक सुरू करण्यासाठी बँकेची सिडकोतील जागा ताब्यात घेऊन रिकव्हरी करून खातेदारांना दिलासा देणार, तसेच कर्जत तालुक्यातील पेज आणि चिल्हार नदीजोड प्रकल्प व्यवहार्य असल्यास त्याचाही विचार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी येथे दिली.