Wed, May 22, 2019 07:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संपूर्ण क्लिप दाखवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

पराभव दिसला की लोक असे वागतात :CM

Published On: May 26 2018 1:44PM | Last Updated: May 26 2018 4:08PMमुबंई : पुढारी ऑनलाईन

साम, दाम, दंड, भेद ही कुटनिती आहे. तुम्ही ज्या कुटनितीचा वापर कराल त्याचाच वापर आम्ही करु असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून झालेल्या आरोपांना मूळ ऑडिओ क्लिप ऐकवून उत्तर दिले. शिवसेनेकडून त्या ऑडिओ क्लिपमधील शेवटचे वाक्य काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी संपूर्ण क्लिप कधीच दाखवलीच नसती कारण ते तोंडावर पडले असते असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

निवडणुकीत बेछुट आरोप केले जातात त्याची उत्तरे दिली नाहीत तर लोकांना ते सत्य वाटते म्हणून आरोपांची उत्तरे देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंदद्र फडणवीस म्हणाले. ते पालघर पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलत होते. ऑडिओ क्लिप व्हायरल करुन शिवसेनेने मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपला उत्तर देताना  मुख्यमंत्री म्हणाले की, मला फार आनंद झाला. पराभव दिसतो त्यावेळी लोक असे वागतात. त्यांनी जे ऐकवले त्याच्या आधीचे आणि शेवटचे काढून न टाकता ऐकवले असते तर कोणत्या नैतिकतेने आम्ही लढतो ते समोर आले असते. म्हणूनच ऑडिओशी छेडछाड करुन ती व्हायरल केली.

मुख्यमंत्र्यांनी भाषण संपताच मूळ ऑडिओ क्लिप ऐकवली.‘आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही पण आपल्याविरुद्ध कोणी सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही ही मानसिकता या निवडणुकीत ठेवली पाहिजे.असे त्या ऑडिओमध्ये शेवटचे वाक्य असे होते. मुख्यमंत्र्यांनी शेवटचे वगळलेले वाक्य त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकवण्यास सांगितले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधील आपल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका ऑडिओ क्लिपच्या आधारावर केला होता.