Sat, May 30, 2020 05:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कामत यांच्या निधनाने कुशल संघटक गमावला’ 

‘कामत यांच्या निधनाने कुशल संघटक गमावला’ 

Published On: Aug 22 2018 11:09AM | Last Updated: Aug 22 2018 11:09AMमुंबई : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असलेला नेता आपण गमावला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या  कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध  जबाबदाऱ्या समर्थपणे  सांभाळल्या  होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा गुरुदास कामत यांनी सांभाळली होती. २००९ ते २०११ या काळात ते युपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखात्याचा आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही सांभाळला. २०१४ मध्ये त्यांना उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१७ ला त्यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 

वाचा : काँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन