Mon, May 27, 2019 08:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग: देवेंद्रजी, या हागणदारीचे काय करायचे? 

ब्लॉग: देवेंद्रजी, या हागणदारीचे काय करायचे? 

Published On: Apr 24 2018 12:14PM | Last Updated: Apr 24 2018 12:14PMदत्तकुमार खंडागळे 

परवा महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात ६० लाखापेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्यातील ३५१ तालुके, २७६६७ ग्रामपंचायती व ४०५०० गावे हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या कामगिरीसाठी देवेंद्रजींचे अभिनंदनच करावे लागेल. ही चांगली उपलब्धी आहे. याबाबत त्यांनी म्हंटल्याप्रमाणे काही नकारात्मक लिहीत नाही. हागणदारी मुक्तीच्या खोलात जात नाही. चुकीला चुक म्हणताना चांगल्याला चांगलेही म्हंटलेच पाहिजे. किमान भक्तांना तेवढा तरी आनंद मिळावा ही इच्छा आहे. असो. 

राज्य हागणदारी मुक्त झाले. हागणदारीतून निर्माण होणार्या रोगराईवर उपचार आज उपलब्ध आहेत. त्यातून निर्माण होणारी रोगराई आटोक्यात आणता येते. तरीही राज्य हागणदारी मुक्त व शौचालय युक्त असणे ही काळाची गरज आहे. या हागणदारीपेक्षा गेल्या तीन-चार वर्षात राज्यात जाती-पातीची, धर्माची हागणदारी निर्माण झालीय त्याचे काय ? देवेंद्रजी ! या हागणदारीचे काय करायचे ? गावाबाहेरच्या हागणदारीपेक्षा ही हागणदारी धोकादायक आहे, पिढ्या नासवणारी आहे. तिचा रोग जडला की त्याच्यावर उपचार करता येत नाहीत. यातून निर्माण होणारी रोगराई खतरनाक आहे. लोकांच्या मस्तकातली ही घाण संपवण्याची कुणाची इच्छा दिसत नाही. देवेंद्रजी किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिच्या मुक्तीचे अभियान चालवणार नाहीत. त्यांनाही ती हवी आहे. सरकारच्या वळचणीची काही माणसं ही घाण निर्माण व्हावी यासाठी राबताना दिसत आहेत. समाज जाती-पातीत विभागला जावा, धर्मा-धर्मात विभागला जावा अशीच त्यांची इच्छा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीची, संघाच्या विविध संघटनामधील माणसं यासाठी झोकून देवून काम करताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हागणदारी कायम ठेवण्यासाठी समरसतेची भाषा वापरतो. भारताला हिंदू राष्ट्र करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. भारतातले सर्वजन हिंदूच आहेत असाही त्यांचा दावा असतो. असे असेल तर संघाने समरसते ऐवजी समानतेची हाक देत जाती-पातीच्या निर्मुलनासाठी पुढे यायला हवे. जात-पात ही भारताला व हिंदू समाजाला लागलेली किड आहे. ही किड दुर करण्यासाठी आर एस एसने पुढाकार घ्यावा. देशाला या नरकातून बाहेर काढावे. ज्या दिवशी देशातला जाती-पातीचा नरक संपेल त्या दिवशी भारत बलदंड व बलशाली राष्ट्र म्हणून उदयास येवू शकते. पण आर एस एस यासाठी पुढे येत नाही. वैदीकशाही व पुरोहीतशाही कशी जिवंत राहिल ? यासाठी ते जीव लावून काम करताना दिसतात. त्यासाठी समरसतेची चळवळ चालवतात. त्यांचा समरसता मंच किंवा समरसतेची चळवळ म्हणजे, शौचाला जावून पाणी न वापरता तशीच चड्डी परिधान करावयाची व स्वच्छ असल्याचा समज करून घ्यावयाचा अशातला प्रकार आहे.

आज भारताच्या पोटात अनेक राष्ट्रे वसली आहेत. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा झेंडा वेगळा आहे. राष्ट्रीय ध्वजापेक्षा आप-आपल्या जातीचे झेंडे लोकांना प्रिय आहेत. प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे राष्ट्र वेगळे आहे. परस्परांच्यात प्रचंड वैर आहे. भारत-पाकिस्तान सारखा संघर्ष आहे परस्परांच्यात. भारताची बहूतेक ताकद यातच खर्च होतेय. म्हणूणच या घाणीपासून देशाला मुक्त करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात भीमा-कोरेगावच्या निमित्ताने हा नरक बळकट करण्याचा प्रयत्न झाला. जाती-पातीत संघर्ष घडवून आणण्याचे कारस्थान पध्दतशीरपणे रचले जात असल्याचे दिसते आहे. या घाणीला सरकारी पातळीवरून पाठबळ मिळत असल्याचे सरकारच्या भूमिका पाहून जाणवते आहे. येणार्या निवडणूकांची तजवीज जाती-पातीच्या संघर्षाच्या माध्यमातून केली जात आहे.

या जाती-पातीच्या हागणदारी पासून राज्याला मुक्त करण्याचे अभियान देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाती घ्यावे. असे झाले तर खर्या अर्थाने त्यांचे नाव इतिहासात अजरामर होईल. या अभियानाची गरज देश पातळीवर आहे. स्वच्छ भारत अभियानात याचाही समावेश केला गेला पाहिजे. गावातला कचरा जितका भयंकर आहे त्याहूनही लोकांच्या मनातला हा कचरा भयंकर आहे. या कचर्याची स्वच्छता सहजा-सहजी होत नाही. गावातला, परिसरातला कचरा काढावयास लोक पुढे येतात पण जाती-पातीच्या कचर्याची कोणाला घाण येत नाही. ही हागणदारी लोकांना सुखावणारी, त्यांचे अहंकार कुरवाळणारी असते. हा नरक लोकांनाही हवा-हवासा वाटतो. राज्यकर्तेही तो कायम कसा राहिल ? याची दक्षता घेताना दिसतात. विविध पक्ष व पार्ट्यांनी या नरकांचे सेल काढले आहेत. प्रत्येक जातीच्या हागणदारीचे प्रमुख त्यांनी नेमले आहेत. त्यांना पदं देवून, प्रतिष्ठा देवून या घाणीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. यात सगळेच पक्ष आघाडीवर आहेत. प्रत्येकाला या घाणीची दुर्गंधी हवी-हवीशी वाटते कारण त्याच्या मागे सत्ताकारणाची गणितं जमवली गेली आहेत. ही गणितं जोवर उध्वस्त होत नाहीत तोपर्यंत नेते मंडळींना ही घाण हवीच आहे. नेत्यांची व त्यांच्या पार्ट्यांची ती गरज आहे. आजकाल एखाद्या बालिकेवर अत्याचार झाला, बलात्कार झाला तर त्यातही जात-पात व धर्म शोधला जातो. पिडीत ज्यांच्या जातीची व धर्माची असते तेवढेच लोक खवळून उठतात. बाकीच्यांना त्याचे काहीच वाटत नाही. बलात्कार हा बलात्कारच असतो. तो मादीवर केला जातो. पण तो हल्ली जातीवर होतो. गेल्या काही वर्षात बलात्कार स्त्रीवर होत नाहीत तर जातीवर होतात. जातीवर झाला की बलात्कारीत जात पेटून उठते. इतर जातीचे पेटत नाहीत. त्यांना त्या घटणेचा संताप येत नाही कारण तो बलात्कार त्यांच्या जातीवर झालेला नसतो. एकविसाव्या शतकातली ही विकृती भयंकर आहे. जग चंद्रावर, मंगळावर झेपावू पाहतय आणि आम्ही जाती-पातीच्या नरकात तोंड खुपसून मस्त होतोय, धुंद होताना दिसतोय. खरेतर लोकाच्या मस्तकातल्या या हागणदारीची घाण साफ करण्याची आत्यंतिक गरज आहे. राष्ट्रीय अस्मितेचा लढा म्हणूण जात-पात मुक्तीचे अभियान छेडण्याची गरज आहे. पण ज्यांच्या राजकारणाची दुकानदारी जाती-धर्माच्या भांडवलावर उभी आहे ते कसे काय हे अभियान छेडतील ? मग त्यांची राजकीय दुकानदारी कशाच्या जोरावर चालणार ? हा त्यांच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. जाती-पाती नष्ठ झाल्या तर सपुर्ण व्यवस्थेचा अय्याशखोरपणे उपभोग कसा घेता येईल ? आपल्या संकुचित जातीय अहंकाराच्या हितासाठी अख्खा देश कसा वापरता येईल ? त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभियान छेडणार नाहीत. त्यासाठी पुढाकार घेणार नाहीत. तेच नव्हे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सुध्दा स्वच्छ भारत अभियानातून या घाणीची व्हिलेवाट लावण्याचा प्रयत्न करणार नाहीत. उलट ही घाण तशीच ठेवून तिच्यावर फुलं टाकून सजवतील, समरसतेची भाषणं झोडतील व फुलाखाली ती घाण दडपून नष्ट केल्याचा आभास निर्माण करतील.

Tags : Devendra Fadnavis, Open Defecation Free state