Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडको गृहयोजना : ऑनलाईन घर विक्रीला उत्तम प्रतिसाद

सिडको गृहयोजना : ऑनलाईन घर विक्रीला उत्तम प्रतिसाद

Published On: Aug 17 2018 5:11PM | Last Updated: Aug 17 2018 10:37PMनवी मुंबई ‬: प्रतिनिधी 

लाखो रुपये खर्च करून घर विक्रीच्या अर्ज पुस्तिका छापणाऱ्या आणि त्यांच्या विक्रीतून तिजोरीत चांगलीच भर घालणाऱ्या सिडकोने यावेळी प्रथम ऑनलाइन अर्ज विक्री सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ४ हजार ८९ नागरिकांनी अर्ज भरून ऑनलाईन घर विक्रीला उत्तम प्रतिसाद दिला. ७३ हजार  ९२४ जणांनी संकेतस्थळाला भेट दिली. तर ३४ हजार ३१४ नागरिकांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे. 

सिडकोने अनेक वर्षांनंतर पाच नोडमध्ये महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. यापूर्वी उलवा येथे बाराशे आणि खारघर येथे साडेतीन हजार घरे बांधण्यात आली आहेत. सिडकोच्या निकृष्ट बांधकामाबद्दल कितीही तक्रारी असल्या तरी ही घरे घेण्यास ग्राहक उत्सुक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी स्वप्नपूर्ती गृहयोजनेचे अर्ज घेण्यासाठी नागरिकांनी एक दिवस आधीच रांगा लावल्या होत्या. दोन बँकांच्या विविध शाखांमध्ये हे अर्ज विकण्यात आणि स्वीकारण्यात आले होते. तरीही सिडकोच्या कार्यालयांत नागरिकांची झुंबड उडत होती.

या सर्व सोपस्कारांना फाटा देऊन नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोचे सर्व व्यवहार हे ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात अर्ज भरण्यापासून शुल्क भरण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. घरांची अर्ज विक्री व सोडत ही ऑनलाइन केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे काम असलेल्या या गृहनिर्मितीचे अर्ज भरण्याची सुरुवात त्यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्टपासून करण्यात आली आहे. या घरांचे अर्ज भरून घेण्यास स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. बुधवारी ४ हजार ८९ अर्ज भरून दाखल करण्यात आले.  एकूण १२ हजार ६४५ नागरिकांनी लॉटरीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी  ४०८९ नागरिकांचे अर्ज ग्राह्य झाले तर ८५५६ नोंदणी केलेल्या नागरिकांनी अनपेड कुठली रक्कम भरणा केलेली नाही. 

अर्जाची किंमत २८० रुपये असून अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी अनामत रुक्कम पाच हजार रुपये आहे. अल्प उत्पन्न गटांतील ग्राहकांसाठी ही रक्कम २५ हजार रुपये आहे. योजनेत घर न मिळाल्यास ही रक्कम परत मिळणार आहे असे सिडकोच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. या दोन्ही गटांतील नागरिक हे स्मार्टफोन वापरत असले, तरी अर्ज भरण्यात त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनालाइन शुल्क भरण्यासाठी त्यांना सायबर कॅफे किंवा ओळखीच्या संगणक साक्षर व्यक्तींची मदत घ्यावी लागत आहे.

सिडकोने प्रॉबिटी सॉफ्ट या खासगी संस्थेची यासाठी नियुक्ती केली आहे. सिडकोने पहिल्यांदाच ऑनलाइन अर्ज विक्री केल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. पणन व जनसंपर्क विभागात चौकशीसाठी शेकडो दूरध्वनी येत आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत अडीच ते तीन लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पात्रता व अटी

या योजनेत भाग घेणाऱ्या नागरिकांचे सिडको कार्यक्षेत्रात घर असता कामा नये अशी अट आहे. यापूर्वी सिडकोच्या सहकारी सोसायटीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात घर असता कामा नये अशी अट होती. ती अट या योजनेसाठी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सिडको कार्यक्षेत्रात घर नसणारे या योजनेत अर्ज करू शकतील. ज्यांचे संपूर्ण देशात कुठेही घर नाही, अशाच व्यक्ती पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

प्रक्रियेसाठी मार्गदर्शन

ऑनलाइन अर्ज भरता न येणाऱ्यांसाठी प्रॉबिटी सॉफ्ट ही खासगी संस्था नेमण्यात आली आहे. १८००२२२७५६ हा त्यांचा हेल्पलाइन क्रमांक आहे. ऑनलाइनमुळे गरजू लाभापासून वंचित राहणार आहे. शहरातील गरजू व्यक्ती हा अर्ज कोणाकडून तरी भरून घेतील, पण ग्रामीण जनतेने काय करावे? त्यांच्यासाठी लिखित अर्जही उपलब्ध करून देणे आवश्यक होते.