Sat, Apr 20, 2019 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीडीआर प्रकरणाचा सूत्रधार अटकेत

सीडीआर प्रकरणाचा सूत्रधार अटकेत

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:23AMठाणे : प्रतिनिधी

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या सौरभ साहू या आरोपीस ठाणे पोलिसांनी रविवारी दिल्लीतून अटक केली. तो अनेकांना मोबाईल सीडीआर विक्री करत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासातून पुढे आली होती. त्यानुसार साहू यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सीडीआर प्रकरणात अटक करण्यात आलेला साहू हा सोळावा आरोपी आहे. सोमवारी त्यास ठाणे कोर्टात हजर केले असता त्यास 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

मोबाईल फोनचे सीडीआर बेकायदेशीररीत्या मिळवणार्‍या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी जानेवारी महिन्यात केला होता. या प्रकरणात काही खासगी गुप्तहेरांसह बॉलिवूडमधील कलाकार मंडळींचादेखील सहभाग असल्याचे समोर आले होते. तर या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 266 सीडीआर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कुणाला पुरवले, याची माहिती ठाणे पोलिसांनी मोबाईल कंपन्यांकडून मागवली होती. त्यात दिल्लीत राहणारा साहू नावाचा व्यक्ती अनेकांना सीडीआर विक्री करत असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले होते. तेव्हापासून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक साहूच्या मागावर होते. अखेर रविवारी ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांच्या पथकाने  साहूला दिल्लीतून अटक केली.