होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विवाहितेच्या घरात सीसीटीव्ही बसवण्याचा वादग्रस्त आदेश मागे

विवाहितेच्या घरात सीसीटीव्ही बसवण्याचा वादग्रस्त आदेश मागे

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:28AMविरार : वार्ताहर

नायगाव, खोचिवडे गावात राहणार्‍या एका विवाहित युवतीच्या राहत्या घरात 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा वादग्रस्त आदेश वसईच्या सहदिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयाने गुरुवारी (काल) मागे घेतला.

खोचिवडे येथील भंडारआळीत राहणारे भूषण म्हात्रे (38) आणि त्यांची पत्नी अपर्णा म्हात्रे (33 वर्षे) हे भूषणचे वडिल विश्वनाथ म्हात्रे यांच्या, अर्थात वडिलोपार्जित घरात राहतात. भूषणची आई विणा म्हात्रे व भूषणचा भाऊ ललित म्हात्रे तसेच भूषणची पत्नी अपर्णा यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत. याबाबत विश्वनाथ म्हात्रे यांनी भूषण व अपर्णाविरोधात न्यायालयात या दोघांकडून त्रास दिला जात असल्याची स्वतंत्र केस व पोटगीचा दावा दाखल केला आहेे. 

विश्वनाथ व विणा म्हात्रे यांनी सहदिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) यांच्याकडे घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आदेश व्हावेत म्हणून केलेला दावा मंजूर करण्यात आला. न्यायाधिशांनी घरात 5 कॅमेरे लावण्याचा तसेच विश्वनाथ यांनी सीसीटीव्हीच्या प्रति (सीडी) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात दाखल करावयाचा आदेश 6 एप्रिल रोजी दिला होता. या आदेशानुसार कॅमेरेही बसवण्यात आले. भूषण व अपर्णा यांनी न्यायाधीश एच.ए.एच.आय.हाश्मी यांची कृती गुन्हेगारी स्वरुपात मोडणारी असल्याचा आरोप करून न्यायाधिशांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्य जिल्हा न्यायाधिश, मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली. त्यानंतर  न्यायाधीश एच.ए.एच.आय.हाश्मी यांनी गुरुवारी  आपले आदेश बिनशर्त मागे घेतले. संबंधित तरुणीच्या घरात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.