Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सी-लिंकच्या पाण्याखाली कॅमेरे शक्य आहेत?

सी-लिंकच्या पाण्याखाली कॅमेरे शक्य आहेत?

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

आत्महत्या होत असल्याने बांद्रा-वरळी सी-लिंक हा सातत्याने चर्चेत आहे. साहजिकच येथे होणार्‍या आत्महत्या कशा रोखता येतील व पुलाची सुरक्षा कशी करता येतील, याबाबत विविध उपायांचा शोध सुरू असतो. त्यानिमित्ताने उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुलावरून होणार्‍या आत्महत्या रोखण्याबरोबरच पुलाच्या सुरक्षेबाबत या परिसरात पाण्याखाली कॅमेरे बसवता येतील का, याबाबत केंद्र सरकार तसेच कोस्टल गार्डला पक्षकार बनवून त्यांच्याकडून अभिप्राय मागविले आहेत. 

निराश झालेल्या लोकांसाठी बांद्रा-वरळी सी-लिंक हा आत्महत्या स्पॉट झाल्याचा दावा करीत केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सुरक्षेबाबत काही त्रुटी असल्याचा दावा केला आहे. तसेच या त्रुटी दूर करून निष्पाप लोकांचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. आर. गवई व भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी होऊन खंडपीठाने कोस्टल गार्ड व केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. 

तिरोडकर यांनी आपल्या याचिकेद्वारा सी-लिंकच्या 4.8 किमी परीसरात अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याबरोबरच पाण्याखाली कॅमेरे बसवणे, बॉम्ब डिटेक्टरचा वापर करणे आदी उपाय सुचवले आहेत. यावर आपले मत मांडताना राज्य रस्ते विकास महामंडळाचे वकील प्रशांत सावंत यांनी ही याचिका 2014 मध्ये दाखल करण्यात आली असून त्यानंतर सदर पुलावर सुरक्षा उपायांमध्ये वाढ केल्याची भूमिका घेतली आहे. तसेच सदर पुलाच्या देखभाल व सुरक्षेची जबाबदारी महामंडळाची असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.