Thu, Jan 17, 2019 23:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नकली सोने गहाण ठेवून  पतपेढी, फायनान्स कंपन्यांना घातला गंडा

नकली सोने गहाण ठेवून  पतपेढी, फायनान्स कंपन्यांना घातला गंडा

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 12:45AMठाणे : प्रतिनिधी

नकली सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून ते सोने फायनान्स कंपनी आणि पतपेढीत तारण ठेवून फसवणूक करणार्‍या चार जणांच्या टोळीच्या कळवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने विविध ठिकाणी गहाण ठेवलेले एक किलो नकली सोन्याचे दागिने आणि 1 लाख 50 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीने रत्नागिरी, मुंबई आणि ठाणे परिसरात एकूण सात ठिकाणी अशा प्रकारे नकली सोन्याचे दागिने गहाण ठेवून एकूण 13 लाख 45 हजाराची फसवणूक केल्याचे पोलीस तपासातून उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी यांनी दिली.

आई आजारी असल्याचे सांगून सोन्याचे नकली दागिने खरे असल्याचे भासवत मुथूट फायनान्समधून तब्बल दीड लाखांचे कर्ज घेऊन पसार झाल्या प्रकरणी सुशांत निशिकांत साळवी (35, रा.मनीषानगर, कळवा) याच्या विरोधात कळवा व नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना या आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने अनेक ठिकाणी अशाच प्रकारे नकली सोन्याचे दागिने गहाण ठेवून फायनान्स कंपन्यांची व पतपेढीची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर झोन एकचे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी कळवा पोलिसांना निर्देश दिले होते.

त्यानुसार कळवा पोलिसांनी आरोपी सुशांत यास कळवातून अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने रासबिहारी नीता इमना (34, चिपळूण, रत्नागिरी), लिकायत अब्दुल कादिर शेख उर्फ राजू शहानी (43, ऐरोली, नवी मुंबई), अनिकेत चंद्रकांत कदम (34, चिपळूण, रत्नागिरी) या आपल्या साथीदारांची नावे उघड केली. या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रासबिहारी नीता इमना हा सोनार असून मुख्यसूत्रधार असलेल्या सुशांत साळवी यास हाच नकली सोन्याचे दागिने बनवून द्यायचा. तर शहानी आणि अनिकेत कदम हे दोघे मध्यस्थी करत फायनान्स कंपन्यांमध्ये नकली दागिने गहाण ठेवायचे.