Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतुकीचे नियम मोडूनही व्हीआयपींनी थकवला दंड!

वाहतुकीचे नियम मोडूनही व्हीआयपींनी थकवला दंड!

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी   

मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतरही दंड न भरणार्‍यांच्या यादीत अनेक दिग्गजांची नावे झळकली आहेत. हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून अनेक राजकीय हस्तींचा या यादीत समावेश आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे या यादीत झळकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

मुंबईच्या रस्त्यावर वाहन चालवताना चालकाकडून अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असते. परिणामी अशा अनेक कारणांसाठी वाहतूक विभागाकडून दंड आकारला जात आहे. फॅन्सी नंबरप्लेट वापरणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा अनेक कारणांसाठी हा दंड आकारण्यात येत असतो. मुंबईत हा दंड वाहतूक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणार्‍यांना वाहतूक विभागाकडून ई-चलान पाठवण्यात येते. त्या ई-चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांनी स्वत: भरायचा असतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नाही. 

आत्तापर्यंत एकूण 119 कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारीने याआधी दिले आहे. हा दंड न भरणार्‍यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलानद्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे. तर राम कदम यांच्या ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण काही दिवसांपूर्वी विकल्याचे त्यांनी म्हटले आहे. ई-चलान भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

अभिनेता सलमान खानशी यासंदर्भात संपर्क साधला असता आपल्याला कोणत्याही प्रकारचे ई-चलन आलेले नाही असे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. ज्या कारने नियमभंग केला त्या कारचा क्रमांक एम. एच. 02 बी. वाय. 2727 असा असून ती कार सलमानचा भाऊ अरबाझ खान याच्या अरबाझ खान प्रॉडक्शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे अशीही माहिती समोर आली.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या एम. एच. 02 सीबी 1234 या वाहनाने नियम मोडले आहेत. डिसेंबर 2016 ते मे 2018 या कालावधीत या कारने सहा वेळा नियमभंग केल्याचे समजते. मात्र उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी असे म्हटले आहे की आदित्य ठाकरे यांना कायद्याचा आदर आहे. त्यांना या प्रकारे कोणतेही ई-चलान आलेले नाही. नियमभंग त्यांच्या कारचालकाकडून झाला असेही प्रधान यांनी म्हटले आहे.

मुंबईचे महापौर महाडेश्‍वर यांच्या गाडीनेही अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांनाही ई-चलान पाठवण्यात आले. मात्र आपल्याला या दंडाबाबत काहीही माहीत नसून वाहनचालकाने वाहतूक नियम मोडले असे स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. 

दंड न भरलेल्या यादीत कोणाची नावे आहेत? 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह विनोदवीर कपिल शर्मा, भाजप नेते राम कदम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान आदी दिग्गजांची या यादीत नावे झळकल्यानेे सामान्यांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कोणावर किती दंड?

राज ठाकरे (गाडी क्रमांक- महाराष्ट्र 46 जे 9)
28 फेब्रुवारी 2018 फॅन्सी नंबर प्लेटसाठी 1000 रुपये
झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रुपये

अरबाज खान (गाडी क्रमांक - महाराष्ट्र 02 बीवाय 2727)
23 जानेवारी 2018-वेगमर्यादा न पाळणे- 1000 रुपये
10 मे 2018 वेगमर्यादा न पाळणे- 1000 रुपये
31 मे 2018- वेगमर्यादा न पाळणे- 1000 रुपये
21 जुलै 2018-वेगमर्यादा न पाळणे- 1000 रुपये

आदित्य ठाकरे (गाडी क्रमांक -महाराष्ट्र 02 सीबी 1234)
10 डिसें. 2016 -झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु.
8 जानेवारी 2018-वेगमर्यादेचे उल्लंघन-1000 रुपये
11 मार्च 2018-वेगमर्यादेचे उल्लंघन- 1000 रुपये
29 एप्रिल 2018-वेगमर्यादेचे उल्लंघन- 1000 रुपये
1 मे 2018-वेगमर्यादेचे उल्लंघन- 1000 रुपये
3 मे 2018-वेगमर्यादेचे उल्लंघन-1000 रुपये