होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील भिकार्‍यांना व्यवसाय प्रशिक्षण!

मुंबईतील भिकार्‍यांना व्यवसाय प्रशिक्षण!

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 2:15AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील जवळपास 70 हजार भिकार्‍यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून हा पायलट प्रोजेक्ट प्रथम मुंबईत सुरू होत असून, या महानगरीतील 20 हजार भिकारी या प्रकल्पात प्रशिक्षित केले जातील.

‘बेगर फ्री स्कीम’ अर्थात भिकारी मुक्‍त शहरे घडवण्यासाठी आखलेल्या कल्पक कार्यक्रमाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्य शासन, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) तसेच समाजातील जवळपास 20 ते 25  महननीय व्यक्तींच्या बळावर हा प्रशिक्षण प्रकल्प राबवण्यात येईल. 

या प्रकल्पात टेलरिंग, सुरक्षा रक्षक, वैद्यकीय सेवक आदी बाबींचे प्रशिक्षण भिकार्‍यांना देण्यात येईल. काही कुटीरोद्योग, लघुउद्योगातील पदांचाही प्रशिक्षणात समावेश असेल. देताना संबंधीत भिकार्‍यांची आवड, कलही विचारात घेतला जाईल. भिकार्‍यांची प्रवृत्ती भीक मागून उदरनिर्वाह करण्याची असल्याने ते असे प्रशिक्षण घेण्यास तयार होतीलच असे नाही. म्हणूनच व्यवसाय, नोकरी करण्यासाठी त्यांची  मानसिकता तयार करावी लागेल. एकदा ते तयार झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तरुणांबरोबरच या प्रकल्पामध्ये लहान  मुलांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी शालेय प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यात येतील. त्याद्वारे ते शालेय शिक्षणही घेऊ शकतील. 

महिला व बालकल्याणचे अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस या प्रकल्पात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण, या दोन्ही खात्यांचा बेघर लोकांशी थेट संपर्क असतो. इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत मुंबईत बेघर अधिक असल्याने या पथदर्शी प्रकल्पासाठी मुंबईची निवड करण्यात आली. मुंबई शहरच्या महिला व बालकल्याण अधिकारी प्रवीण भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकार्‍यांसाठीचे प्रशिक्षण 15  ते 30 दिवसांचे असेल. यात त्यांना शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या यशस्वी व्यक्तींच्या कथा व्हीडीओतून दाखवल्या जातील. यापैकी काही यशस्वी उद्योजकांची थेट भेटही घडवली जाईल. अशाच प्रकारचा एक प्रयोग पुण्यात 2200 मुलांसाठी राबवण्यात आला आणि या मुलांनी भीक मागणे किंवा रस्त्यावरची फुटकळ कामे करणे सोडून आता शिक्षणाचाच ध्यास घेतल्याचे अधिकारी सांगतात.