Sat, Jul 20, 2019 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-कोल्हापूर प्रवास, मोजा ५७५ रुपये

मुंबई-कोल्हापूर प्रवास, मोजा ५७५ रुपये

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:07AMमुंबई : संजय गडदे

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. या  दरवाढीमुळे सामान्यांची लालपरी अशी ओळख असणार्‍या एसटीचे उत्पन्न अगदी अल्पस्वरुपात वाढणार असले तरी त्याचा सर्वाधिक फटका मात्र नियमितपणे एसटीने प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांना बसणार आहे. या प्रवासी भाडेवाडीमुळे मुंबई ते कोल्हापूर या 396 किमीच्या प्रवासासाठी 15 जूनपासून 485 ऐवजी 575 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबई-गोवा या 576 किलोमीटर अंतरासाठी प्रवाशांना 606 रूपयांऐवजी 716 रुपये मोजावे लागणार 
आहेत.

सध्या एसटीने राज्यभरात दररोज 70 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईच्या पाच प्रमुख आगारांतून राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व मुख्य गावांसाठी रोज सुमारे 1200 एसटी जात असतात. त्यातून सुमारे पावणे दोन प्रवासी नियमित प्रवास करत आहेत. सध्या एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रवासासाठी वेगवेगळे भाडे निश्चित करण्यात आले आहे. साध्या गाडीच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रवासासाठी 6:30 रुपये, रातराणीच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रवासासाठी 8:60 रुपये., तर शिवशाहीच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रवासासाठी किमान भाडे 9.60 रुपये मोजावे लागत आहेत, मात्र 15 जूनपासून यात बदल होणार असल्याने त्याची झळ ही सामान्य प्रवाशांना सोसावी लागणार हे मात्र निश्चित आहे. 

मुंबई-पुणे या 164 किमीच्या प्रवासासाठी साध्या गाडीचे तिकीट सध्या 171, हिरकणीसाठी 233, शिवशाहीसाठी 253 आणि शिवनेरीसाठी 470 रुपये इतके आकारले जात असून, 15 जूनपासूनच्या भाडेवाडीमुळे याच प्रवासासाठी अनुक्रमे 200; 275; 300 आणि 555 रुपये याप्रमाणे तिकिटभाडे मोजावे लागणार आहेत. मात्र मुंबई- पुणे शिवनेरीसाठीची भाडेवाढ ही व्हॉल्व्हो बसच्या तुलनेत अधिक असल्याने प्रवासी  शिवनेरीची प्रवास निवडतील का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.