Wed, Jul 17, 2019 08:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 12:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

पोलादपूर येथील अंबेनळी घाटात दरीत बस कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महसूल व मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केली. या अपघाताची चौकशी करण्यासोबतच भविष्यात असे अपघात घडू नयेत म्हणून शिफारशी सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्यापकांच्या बसला झालेला अपघात अतिशय दुर्दैवी होता. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने चार लाख रुपयांची मदत करण्यात येईल. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक असणारी सर्व ती मदत सरकार करील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

या बस अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या अपघाताबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र दु:ख व्यक्‍त केले आहे.