Mon, Feb 18, 2019 18:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाकुर्लीत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज लंपास

ठाकुर्लीत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज लंपास

Published On: Mar 15 2018 6:00PM | Last Updated: Mar 15 2018 6:11PMडोंबिवली : वार्ताहर

बुधवारी देवदर्शनासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या बंगल्यातील बाथरूमचे ग्रील वाकवून चोरट्यांनी घरातील तब्बल २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. बंद दारांची कुलपे तोडून, खिडक्यांच्या ग्रील उचकटून घरांतील लाखोंचा माल लंपास करण्याचा सपाटा लावणाऱ्या चोरट्यांनी पोलिस खात्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. पोलिसांच्या सर्व यंत्रणा वाढत्या घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली-चोळेगाव येथे समर्थ कृपा बंगल्यामध्ये राहणारे परेश पाटील यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाटील कुटुंब दाराला कुलूप लावून खंडोबाच्या जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. याच दरम्यान दाराला कुलूप असल्याची संधी साधत  चोरट्यांनी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला. या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि रोख रक्कम असा २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या पाटील कुटुंबीयांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने, पाटील यांनी डोंबिवली पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परेश पाटील यांच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला.