Sun, May 19, 2019 22:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंटी-बबलीकडून कल्याणच्या बिल्डरला 30 लाखांची टोपी

बंटी-बबलीकडून कल्याणच्या बिल्डरला 30 लाखांची टोपी

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:01AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

सांगली येथे राहणार्‍या दाम्पत्याने कल्याणच्या एका बिल्डरला सहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत तब्बल 30 लाखांची टोपी घातल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. अंकुश व पूजा कदम असे परागंदा झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी बिल्डरने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बंटी-बबलीचा शोध सुरू केला आहे. 

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील श्री साई श्रद्धा सोसायटीत राहणारे सचिन अडसूळ हे बांधकाम व्यासायिक आहेत. त्यांचे रामबाग परिसरात अनिरुद्ध डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात सांगली येथे राहणार्‍या अंकुश व पूजा कदम या दाम्पत्याने अडसूळ यांना सहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. यासाठी अंकुशने आपले नाव बदलून आपण राकेश पाटील असल्याचे सांगितले. याच दरम्यान अंकुशने कल्याण येथील अडसूळ यांच्या कार्यालयात येवून प्रोसेसिंग फी म्हणून 30 लाखांची रक्कम उकळली. पैसे देऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी कर्ज मंजूर न झाल्याने अडसूळ यांनी विचारणा केली. मात्र, दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे सचिन अडसूळ यांच्या लक्षात आले. 

याप्रकरणी बिल्डर अडसूळ यांनी अखेर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी कागदोपत्री पुरावे घेऊन अडसूळ यांची फिर्याद नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अंकुश व पूजा कदम या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.