Thu, Apr 25, 2019 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मरण भयावर मात करणारे बंजी जंम्पिंग

मरण भयावर मात करणारे बंजी जंम्पिंग

Published On: May 22 2018 11:46PM | Last Updated: May 22 2018 11:46PMजगातील सर्वोच्च बंजी जंम्पिंग

ब्लोक्रांत ब्रिज, दक्षिण आफ्रिका   उंची : 216 मीटर

भारतातील 5 बंजी जंम्पिंग

1)     ऋषिकेश/ मोहनछट्टीगांव    उंची : 83 मीटर

2)     लोणावळा    उंची : 45 मीटर

3)     बंगळुरू    उंची : 25 मीटर

4)     गोवा / अंजुनाबीच    उंची : 25 मीटर

5)     जगदालपूर / छत्तिसगढ    उंची : 30 मीटर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

निसर्ग माणसाला जितका प्रसन्न करतो तितकाच तो भयभीतदेखील करून सोडतो. निसर्गाच्या या भयकारी तत्वाचा वापर करीत दक्षिण आफ्रिकेनेे आपले पर्यटन क्षेत्र मोठे रोमांचक केले आहे. जगात सर्वात साहसी आणि रोमांचकारी काही असेल तर ते आहे बंजी जम्पिंग ! प्रचंड उंचीवरून उडी 

मारण्याचा हा अनुभव आता भारतात किमान पाच ठिकाणी घेता येत असला तरी दक्षिण आफ्रिकेची उंची या भारतीय अनुभवाला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ब्लोक्रांस नदीवर बांधलेल्या अतिउंच पुलावरून खालच्या खोल दरीत स्वतःला झोकून देणे हा खायचा विषय नाही. उडी मारण्याची जागा ही समुद्र सपाटीपासून तब्बल 216 मीटर आहे जे बंजी जम्पिंगचे सर्वोच्च शिखर मानले जाते. इथून जो उडी मारतो त्याने आयुष्यातल्या कोणत्याही प्रकारच्या भीतीवर कायमची मात केली म्हणून समजावे. 

ब्लोक्रांसचे बंजी जम्पिंग हा भयंकर मानसिक परीक्षा पाहणारा खेळ आहे. जिथून उडी घ्यायची तिथे जाण्यासाठी आधी 216 मीटर लांबीचा अरुंद पूल तुडवत जावे लागते. हा पूल साधा नाही. पायाखाली फक्त जाळी असते आणि त्या जाळीतून भयंकर खोल दरीचे दर्शन तुमच्या छातीचे ठोके वाढवत राहते. एक एक पाऊल टाकतांना तुम्हाला तुमचेच मन सांगत राहते की थोडे पुढे गेले की पायाला दोर बांधून याच दरीत तुला उडी मारायची आहे... उडी मारण्याच्या ठिकाणी पोचतो तेव्हा तुमच्या छातीत सुरू असलेली धडधड तुम्हाला इतकी ऐकू यायला लागते की कानठळ्या बसाव्यात. उडी मारणारे एक एक करून तयार होत असतात. तुमचे सारे शरीर तोलून धरू शकेल असा बेल्ट तुम्हाला आधीच लावलेला असतो. उडी मारण्याच्या ठिकाणी तुमचे दोन्ही पाय बांधले जातात आणि एक मोठा दोरखंड त्यांना जोडला जातो. तुमच्यापासून उडी मारण्याचा बिंदू फार तर तीन फुटांवर असतो. तिथपर्यंत तुम्हाला एक एक उडी मारतच पोचावे लागते.

तुमच्या दोन्ही बाजूला तिथले तज्ज्ञ उभे असतात. तुम्ही आता अशा टोकावर असता की उडी मारताक्षणी तुम्ही 216 मीटर खोल दरीत कोसळणार... त्या भयंकर खोल दरीत पाहताक्षणी मरणाचे भय काय असते याचे साक्षात दर्शनच तुम्हाला घडते. दरीच्या पार तळाशी वाहणारी ब्लोक्रांस नदी दिसते तुम्हाला... तिचा तितकाच नितळ प्रवाह देखील तुम्हाला कुठला दिलासा देणार नसतो. काही विचार-फेरविचार होण्याच्या आत एक तर तुम्ही उडी मारलेली असते किंवा त्या दोन सज्जनांनी तुम्हाला त्या दरीत ढकलून दिलेले असते. पायाला दोर असतो पण पार खाली पोचेपर्यंत त्याचा कुठलाच आधार तसा जाणवत नाही. आणि ज्या क्षणी हा दोर तुम्हाला तोलून धरू लागतो त्या क्षणी आपण वाचलो, खोल दरीत कोसळून देखील आपण जिवंत आहोत ही मोठी दैवी जाणीव तुम्हाला होते आणि त्या दरीत तुम्ही पुनर्जन्माच्या झोक्यावर झुलत असता... 

भीती ही तात्कालिक गोष्ट आहे, पण खंत आयुष्यभर सरत नाही, असे एक वचन तिथे ठळकपणे लावलेले आहे. ते वाचून जो भयावर मात करतो तो झोकून देतो स्वतःला त्या खोल दरीत. जगातल्या या सर्वात उंच पुलावरून उडी घेतलेल्या धाडसी लोकांच्या क्लबमध्ये तुम्ही जाऊन बसता. या बंजी जम्पिंगचा उंचीशिवाय आणखी एक विक्रम फेस आद्रेनालिन या संचालक कंपनीने नोंदवला आहे. तो म्हणजे आजवर इथे एकही अपघात झालेला नाही. 

भारतात बंजी जम्पिंग सुरु झाले ते दक्षिण आफ्रिकेकडे पाहूनच. आजघडीला ऋषीकेश, लोणावाळा, बंगळुरू, गोवा आणि छत्तीसगढ अशा पाच ठिकाणी भारतात बंजी जम्पिंगचा रोमांचक अनुभव घेता येतो. पण ब्लोक्रांस नदीवरील सर्वात उंच बंजी जम्पिंग पाहिले की वाटते  दक्षिण आफ्रिकेसारखाच दर्‍याखोर्‍यांचा, महाकाय पर्वतराजीचा निसर्ग लाभूनही आपण अजून दोरीवरच्या उड्या मारत आहोत !