Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनचे टर्मिनल बीकेसीत 

बुलेट ट्रेनचे टर्मिनल बीकेसीत 

Published On: Feb 28 2018 2:17AM | Last Updated: Feb 28 2018 2:05AMमुंबई : प्रतिनिधी 

 मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे टर्मिनल उभारण्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील जागा हस्तांतरित करणारी कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सुपुर्द केली. शिवसेनेचा विरोध डावलून सरकारने हे हस्तांतरण केले. यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास आता गती मिळणार आहे. 

बुलेट ट्रेन : बीकेसीतील जमीन हस्तांतरित

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई- अहमदाबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पांतर्गत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील बीकेसीतील जागा देण्यास अखेर राज्य सरकारने जमिनीचे हस्तांतर केले आहे. शिवसेनेचा विरोध डावलून राज्य सरकारने रेल्वे प्रशासनास भुयारी टर्मिनलसाठी 4.6 हेक्टर आणि 0.9 हेक्टर जमीन दिली. या ठिकाणी भुयारी बुलेट ट्रेन टर्मिनल बनवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अधिकृतरित्या या जागेसंबंधित कागदपत्रे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सुपुर्द केले. 

मुंबई-अहमदाबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पांतर्गत बीकेसी येथे भुयारी हायस्पीड टर्मिनल उभारण्यात येणार आहे. यासाठी भूगर्भाखाली 4.6 हेक्टर तर त्याच्यावर 0.9 हेक्टर जमीन नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडला एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली आहे. यासंबंधीची कागदपत्रे फडणवीस आणि रेल्वे मंत्री गोयल यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खाडे यांच्याकडे सुपूर्त केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन, जपानचे वाणिज्यदूत रिओजी नोडा, खा. कपिल पाटील, आ. आशिष शेलार यांच्यासह जपानच्या सल्लागार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनल बनवण्यासाठी रेल्वे प्रशासनास बीकेसीमधील जागेची आवश्यकता होती, या जागेवर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) उभारण्याचा प्रस्ताव होता. यामुळे ही जागा देण्यास एमएमआरडीए प्रशासनाने नकार दिला होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुलेट ट्रेन प्रकल्प हा महत्वकांशी प्रकल्प असल्याने रेल्वे प्रशासन या जागेवरच अडून बसले. यानंतर बीकेसीमधील जागा बुलेट ट्रेन टर्मिनलसाठी देण्याचे निश्‍चित करण्यात आले. आता याठिकाणी भुयारी बुलेट ट्रेन टर्मिनल बांधण्यात येणार असून त्यावर आयएफएससी उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचे बांधकाम रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठीचा खर्च 25 टक्के महाराष्ट्र सरकार, 25 टक्के गुजरात सरकार तर 50 टक्के वाटा रेल्वे प्रशासन उचलणार आहे. यातील 5 हजार कोटींचा पहिला हप्ता राज्य सरकारने दिला असून शिवसेने परिवहन मंत्री असलेले दिवाकर रावते यांच्या विभागातर्फे 125 कोटी देण्यात येणार आहे. बीकेसी येथील जागेची किंमत 125 कोटी रूपये असल्याने राज्य सरकारच्या वाट्यातून ही रक्कम वगळण्यात येणार आहे. या प्रकल्पाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी विरोध दर्शवला होता, मात्र सध्या तरी शिवसेना या मुद्द्यावर गप्प दिसत असून सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून हा मुद्दा उचलून धरण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील कार्यक्रम संपल्यानंतर परळ येथील रेल्वे पादचारी पुलाच्या उद्घाटनासाठी आलेले फडणवीस, गोयल यांनी लोकलमधून परळ रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास केला.