Tue, Jul 16, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दुप्पट मोबदला : प्रशासन

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दुप्पट मोबदला : प्रशासन

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:03AMठाणे : प्रतिनिधी 

मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ठाणे तालुक्यात सुमारे 20 हेक्टर जमीन संपादन करावी लागणार असून शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता त्यांच्याशी वाटाघाटी करून जमिनीस योग्य किंमत दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलेे. तर रेडीरेकनरप्रमाणे पाचपट मोबदला आणि प्रकल्पग्रस्त कुटुंंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी रेल्वेत नोकरी देण्याची मागणी शेतकर्‍यांनी नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत केली. 

रेल्वे कोर्पोरेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित 9 गावांतील शेतकर्‍यांना जमीन संपादित करावयाची आहे. विश्वासात न घेता सुरू झालेल्या सर्वेक्षणास शेतकर्‍यांनी विरोध केला होता. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटून आपली कैफियत मांडण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन शनिवारी जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी शेतकर्‍यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पात नोकर्‍या मिळाव्यात, जमिनीला पाचपट मोबदला मिळावा आणि  रेल्वेच्या अतिवेगामुळे निर्माण होणार्‍या कंपनांचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्या केल्या. तसेच जमीन मोबदल्याच्या वाटाघाटींमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून नये, अशीही भूमिका मांडण्यात आली. गावकरी आणि शेतकरी यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन प्रशासन काम करेल, असे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले. या बैठकीला 9 गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.  

शेतकर्‍यांना दुप्पट मोबदला 

खुल्या वाटाघाटीनेच शेतकर्‍यांचे नुकसान होऊ न देता जमीन खरेदी करण्यात येईल. 26 मे 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे दर दिले जातील. ज्या ठिकाणी विकास आराखडा लागू आहे, अशा क्षेत्रासाठी रेडी रेकनरच्या दरात तेवढीच रक्कम दिली जाईल. म्हणजे दुप्पट मोबदला शेतकर्‍यास मिळेल. तसेच 25 टक्के जादा रक्कम ही थेट खरेदी करणार्‍यांना  मिळेल. एकाच सातबार्‍यावर जितक्या व्यक्तींची नावे असतील त्या सर्वांच्या संमतीने जमीन खरेदीचा व्यवहार होईल आणि पूर्णत: पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे असेही परदेशी यांनी सांगितले. लवकरच या 9 गावांमध्ये संयुक्त जमीन मोजणी प्रक्रिया होईल आणि त्यानंतर संपादीत जमिनीची हद्द निश्चित करून मग वाटाघाटी होतील. त्यामुळे मोजणी पथकाला गावकर्‍यांनी पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

यावेळी तहसीलदार अधिक पाटील, सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, शैलेंद्र बेंडाळे, सुरेश इंगोले, नगरसेवक हिरा पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, आगासन गाव बचाव संघर्ष समिती अध्यक्ष रोहिदास मुंडे तसेच 9 गावांतील सर्व बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते.

Tags : mumbai, mumbai news, Bullet train project,  person Double reward, Administration,