Thu, Jun 20, 2019 01:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनची बैठक उधळली

बुलेट ट्रेनची बैठक उधळली

Published On: May 03 2018 1:42AM | Last Updated: May 03 2018 1:36AMपालघर : वार्ताहर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रकल्पासंदर्भात आयोजित केलेली बैठक स्थानिक भूमिपुत्रांनी उधळून लावली. बैठकीच्या ठिकाणी व्यवस्था नसल्याचा आरोप करत भूमिपुत्र आक्रमक झाले. त्यातच ही बैठक कायदेशीर नसल्यामुळे ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यामुळे ही बैठकच गुंडाळण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वसई आणि तलासरी या चार तालुक्यांतील 80 गावांमधील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने हाती घेतला आहे. या संदर्भात बाधित नागरिक आणि त्यांच्या अधिकारासाठी लढणार्‍या संघटनांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकार्‍यांनी सभागृहात प्रवेश करताच बुलेट ट्रेनविरोधात घोषणाबाजी करून आयोजकांनी बसण्यासाठी खुर्च्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

मात्र, खुर्च्यांची व्यवस्था न झाल्याने भूमिपुत्रांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सरळ उठून जमिनीवर बैठक मारली. यावेळी संबंधित बैठक कायदेशीर नसल्याचे सांगून रद्द करण्याची मागणी प्रकल्पबाधितांनी केली. जपानच्या जिका या खासगी कंपनीच्या कामासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाला जुंपणे संपूर्णतः बेकायदेशीर असल्याचा आरोप जनआंदोलन समितीचे शशी सोनवणे यांनी केला. बाधितांना तसेच त्यांच्या संघटनांना जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेला बोलवून त्यांच्या साखरे, कोठारपाडा, चरी आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा छुपा डाव कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर उघडा पाडून हे काम तात्काळ बंद करण्याची मागणी केली. त्यावेळी नॅशनल रेल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांनी असा कोणताही प्रकार सुरू नसल्याचा दावा केला.

आपल्या दालनात बसलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीस्थानी येऊन छुप्या पद्धतीने जमीन अधिग्रहणाचे काम बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उपस्थितांनी लावून धरली. मात्र, तुम्ही शिष्टमंडळासह माझ्या दालनात चर्चेला या असा निरोप जिल्हाधिकार्‍यांकडून येताच संतप्त महिलांनी त्यांच्या दालनाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना अटकाव करणार्‍या पोलिसांशी महिलांची बाचाबाची झाली. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या जमिनी बुलेट ट्रेन आदी कोणत्याही प्रकल्पाला द्यायच्या नाहीत, असा इशारा महिलांनी दिला.

Tags : Mumbai, mumbai news, Bullet train, meeting uprooted,