होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिवा-शीळचा बुलेट ट्रेन सर्व्हे उधळला

दिवा-शीळचा बुलेट ट्रेन सर्व्हे उधळला

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:45AMठाणे : प्रतिनिधी

दिवा-शीळ येथे बुलेट टे्रनसाठी सुरू असलेला जमिनीचा सर्व्हे  मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तीव्र विरोध करत बंद पाडला. यावेळी जमीन मोजणीचे साहित्य फेकून देण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून रेल्वे अधिकारी, ठाणे तहसीलदार, भू-अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून दिवा येथील म्हातार्डी, आगासन, शीळ-डायघर या परिसरातून बुलेट ट्रेन मार्गाचा सर्र्व्हेे सुरू होता. त्याला स्थानिक शेतकर्‍यांनी सुरुवातीला विरोध केला होता. आधी संपादन केल्या जाणार्‍या जमिनीचा प्रशासनाने मोबदला सांगावा, नंतरच सर्व्हे करावा, असे शेतकर्‍यांनी ठाणे प्रांताधिकार्‍यांना नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगितले होते.  

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथे झालेल्या जाहीर सभेत, मुंबईचा आर्थिक व्यवहार गुजरातला घेऊन जाण्याकरिता या बुलेट ट्रेनचा हट्ट पंतप्रधानांनी धरला असल्याचेे सांगत स्थानिक शेतकर्‍यांनी बुलेट ट्रेनकरिता आपल्या जमिनी देऊ नयेत, प्रशासन जोरजबरदस्ती करेल तर बुलेट ट्रेन मार्गावरील रूळ उखडून टाका, असे सांगितले होते.  या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. 

दिवा परिसरातील शीळफाटा येथे सोमवारी दुपारी रेल्वे अधिकारी, ठाणे तहसीलदार, भू-अभिलेख अधिकारी यांनी शीळफाटा परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये जमीन मोजणीला सुरुवात केली. त्यावेळी जमीन मोजणीला सुरुवात करताच मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सर्व्हे करणार्‍या अधिकार्‍यांना मोजणी करण्यास तीव्र विरोध करत, पोलीस बंदोबस्ताला धुडकावत जमीन मोजणीच्या मशीन फेकून देऊन तीव्र आंदोलन केलेे. 

त्यानंतर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले; परंतु कार्यकर्ते हटले नाहीत, त्यामुळे रेल्वे अधिकारी, ठाणे प्रांत, तहसीलदार यांना आंदोलनाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मनसेच्या पदाधिकार्‍यांसोबत तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करून मनसे सैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु एका बाजूला बैठक सुरू असताना दंगल नियंत्रण पथकाच्या सुरक्षा फेर्‍यामध्ये शासनाच्या अधिकार्‍यांनी संध्याकाळी पुन्हा सर्व्हे सुरू केला. या दरम्यानही विरोध केल्यानंतर  काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर उद्या हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते येऊन बुलेट ट्रेनला विरोध करतील, तरीही पोलीस बंदोबस्तात सर्व्हे सुरू राहिला तर आम्ही गनिमी कावा करून सर्व्हेला विरोध करू, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.   

Tags : Mumbai, mumbai news, Bullet train, land, survey,