Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेन : मनोरची जनसुनावणी विरोधामुळे रद्द

बुलेट ट्रेन : मनोरची जनसुनावणी विरोधामुळे रद्द

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:25AMमनोर : वार्ताहर 

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी पालघरमधील जीवन विकास हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली. नागरिकांचा प्रचंड विरोध आणि काही बाधितांनी मंडपातच उपोषणाचा मार्ग अवलंबल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सदर सुनावणी रद्द केली. या सुनावणीला पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प अधिकारी, बाधित ग्रामस्थ, पर्यावरणवादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनावणीपूर्वी बाधित ग्रामस्थांना तसेच नागरिकांना मराठी भाषेत अहवाल देण्यात आला नाही. तसेच संकेतस्थळावरही माहिती टाकण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. आम्हाचा यासंदर्भात माहितीच नाही, तर जनसुनावणी कशाची, असा थेट प्रश्‍न उपस्थित केला. आम्हाला प्रथम माहिती द्या, त्यानंतर जनसुनावणी घ्या, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. तर काही ग्रामस्थांनी उपोषणही सुरू केले. परिस्थिती चिघळत असल्याचे बघून ही सुनावणी जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केली. दरम्यान, भूमिपूत्र बचाव समितीचे रमाकांत पाटील, मनसेचे कुंदन सखे, पर्यावरण समितीचे समीर वर्तक,  शशी सोनावणे आदींनी आपल्या भूमिका मांडल्या.

जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना सुनावले

2 मे 2018 रोजी पार पडलेल्या जनसुनावणीत सर्व ग्रामपंचायतींना मराठीत अहवाल द्या तसेच संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. मात्र आज पार पडलेल्या जनसुनावणीच्यावेळी ग्रामस्थांना मराठीत माहितीच उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. ग्रामपंचायतींना व बाधितांना अहवाल द्या, नंतरच सुनावणी घ्या असे निर्देश देवून ही सुनावणी रद्द करण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.