Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिवेकरांच्या विरोधामुळे ‘बुलेट ट्रेन’ ला ब्रेक

दिवेकरांच्या विरोधामुळे ‘बुलेट ट्रेन’ ला ब्रेक

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:19AMठाणे : अमोल कदम

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेवर आक्षेप घेत ठाणे जिल्ह्यातील चार गावांतील ग्रामस्थांनी संयुक्त मोजणीस कडाडून विरोध केला. त्यामुळे मंगळवारी भूमी अभिलेखा कर्मचारी-अधिकार्‍यांना संयुक्त मोजणी करता आली नाही. 

देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे. या ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील 20 गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहेत. दिवानजीकच्या म्हातार्डी गावात स्टेशन प्रस्तावित असून उर्वरीत गावांमधून भूमिगत रेल्वे लाईन जाणार आहे. भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे तालुक्यातील बाधित 7 गावांपैकी डावले, पडले, देसाई व आगासन या चार गावांमध्ये मंगळवारी सकाळी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी-अधिकारी, अभियंता, बुलेट ट्रेन कंपनीचे अधिकारी पोहोचले. 

आगासन गावातील पाण्याच्या टाक्यांपाशी रिक्षामध्ये बसून भू-संपादन विभागाचे महिला कर्मचारी व रेल्वे अधिकारी आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना लागली आणि त्यांनी तातडीने धाव घेऊन मोजणी करण्यास कडाडून विरोध करण्यास सुरूवात केली. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता तुम्ही कसा काय सर्वे सुरू करू शकता? शेतकर्‍यांच्या जमिनीमधून बुलेट ट्रेनचा मार्ग नेण्याआधी शेतकर्‍यांना विचारणे गरजेचे होते, थेट जमिनीची मोजणी करण्यास भूसंपादन विभागाचे कर्मचारी कसे आले? अशा प्रकारच्या प्रश्‍नांची सरबत्ती करीत सात गावांतील ग्रामस्थांनी मोजणीस कडाडून विरोध केला.

सरकारतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकर्‍यांची जमीन हडप करण्याचा हा डाव असून आम्ही आमच्या हक्काची शेतीची जमीन देणार नाही, असे शेतकर्‍यांनी सरकारी कर्मचार्‍यांना सुनावले. ग्रामस्थांचा आक्रोश पाहून  सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांनी आगासन विभागातून मोजणी न करताच निघून जाणे पसंत केले. कारण पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नव्हता. भूसंपादनाच्या पहिल्याच प्रयत्नाला ग्रामस्थांनी ब्रेक लावल्याने पुढील मोजणी प्रशासनाला चोख बंदोबस्तासह करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. 

दरम्यान, सर्वे करण्यापूर्वी शेतकर्‍यांना विश्‍वासात घ्यावे. विकासाला विरोध नाही पण शेतकरी भूमिहीन होता कामा नये, असे मत  आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.