Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारत बांधकामाची परवानगी जलद मिळणार!

इमारत बांधकामाची परवानगी जलद मिळणार!

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:27AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील इमारत बांधकाम परवानगीतील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने परवानगी देण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही नवी यंत्रणा उभारण्यासाठी महापालिका 8 कोटी 13 लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाची परवानगी जलद मिळणार आहे. 

मुंबईत इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी एकखिडकी योजना सुरु झाली आहे. पण याचा फारसा फायदा झाला नसल्याचे जागतिक बँकेने एका अहवालात नमूद केले होते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून परवानगीसंदर्भातील माहिती मागवली होती. त्यामुळे पालिकेने बांधकाम प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेने बांधकामांना परवानगी देण्यासाठी ऑटो डीसीआर पध्दत सुरु केली आहे. यात ऑनलाईन अर्ज करुन बांधकामांना ठरलेल्या मुदतीत ऑनलाईनच परवानगी दिली जाते.

मात्र, त्याची पडताळणी विविध विभागातील संबंधित अधिकार्‍यांमार्फत केली जाते. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यास विलंब होतो. बांधकाम परवानगीचा विलंब टाळण्यासाठी काही टप्प्यांवर अर्जांची छाननी ऑनलाईन करुन, तसा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतींचा त्रिमितीय आराखडाही तयार केला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्वयंचलित पध्दतीने होणार असल्याचे पालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या कामासाठी सॉफ्टटेक इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीला आठ कोटी 13 लाख रुपये देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.