Mon, May 20, 2019 10:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिरारोडमध्ये बिल्डरने केली 2 कोटी 34 लाखांची फसवणूक

मिरारोडमध्ये बिल्डरने केली 2 कोटी 34 लाखांची फसवणूक

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:11AMमुंबई ः प्रतिनिधी

मिरारोड येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामासाठी घेतलेल्या 2 कोटी 34 लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरसह दोघांविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पैशांच्या मोबदल्यात बारा फ्लॅटचे आमिष दाखवून या दोघांनी या फ्लॅटची परस्पर विक्री करून ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तपास सुरू असल्याने या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले. 

महेश गौरीशंकर दवे (74) हे विलेपार्ले येथील मालविया रोडवरील शिमोनी अपार्टमेंटमध्ये राहतात. माहीम येथील नॉथर्न स्टार हाईट्स इन्फ्रास्ट्रक्‍चर या खासगी कंपनीत ते सध्या कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आरोपींच्या कंपनीकडून एक प्रस्ताव आला होता. आरोपी हे बिल्डर असून त्यांचे मिरारोड येथील उन्नती सदन या इमारत प्रोजेक्टचे बांधकाम सुरू होते. या प्रोजेक्टमध्ये महेश दवे यांनी आर्थिक सहाय्य केले तर, त्या मोबदल्यात या इमारतीमध्ये बारा फ्लॅट देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्यात तसा करारही झाला होता. 

मात्र इमारत पूर्ण झाल्यानंतर बिल्डरने फ्लॅट्स न देता फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच दवे यांनी माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांची भेट घेतली होती. तिथे लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर बुधवारी बिल्डरसह दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले.