Wed, Jan 16, 2019 09:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी इमारत दुर्घटनेत बिल्डरला अटक

भिवंडी इमारत दुर्घटनेत बिल्डरला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर 

भिवंडी शहरातील नवीबस्ती भाजी मार्केट येथील अनधिकृत धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जण ठार तर 9 जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी इमारतीचे बांधकाम करणार्‍या बिल्डरला जबाबदार धरुन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम शुक्रवारी रात्रभर सुरू होते.

शनिवारी पहाटे ढिगार्‍याखालून महिलेचा आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. परवीन अश्फाक खान (35) असे या महिलेचे नाव आहे. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 4 वर गेला आहे. 

नवीबस्ती भाजीमार्केट भागातील ही तळ अधिक तीन मजली अनधिकृत इमारत शुक्रवारी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही दुर्घटना इतकी भयानक होती की, पहिल्या मजल्यापर्यंतचा भाग हा जमिनीत गाडला गेला होता. ही इमारत नजीकच्या कौलारू घरावर कोसळल्याने त्या घरातील 19 वर्षीय रुक्सर खान गतप्राण झाली तर तिचे वडील याकूब व तीन भाऊ जखमी झाले आहेत.

इमारतीत राहणारे कुटुंबीय गाडले गेल्यानंतर स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या मदतीने सुरुवातीला पाच जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची व्याप्ती पाहता ठाणे, कल्याण व मुंबई येथील अग्निशामक दलाची मदत घेतली जात असतानाच दुपारी  एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. दुर्घटनेस इमारतीचे बांधकाम करणार्‍या बिल्डर ताहीर अन्सारी यास जबाबदार धरून स्थानिक प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील भोईर त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 304-2, 337, 338, 34 व एमआरटीपी 52 प्रमाणे गुन्हा दाखल करून बिल्डर ताहीर अन्सारी यास अटक करण्यात आली आहे.