Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डर निरंजन हिरानंदानी अडचणीत

बिल्डर निरंजन हिरानंदानी अडचणीत

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवणार्‍या ‘पवई हाऊसिंग स्कॅम’ची चौकशी बंद करण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या स्कॅममध्ये नामांकित बिल्डर निरंजन हिरानंदानी व काही वरिष्ठ शासकीय अधिकारी गुंतले असल्याचा आरोप असून, न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

याबाबत सामाजिक कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या गृहसंकुलामध्ये अनेक अनियमितता घडल्या असून बिल्डर निरंजन हिरानंदानी व काही शासकीय अधिकार्‍यांचा यामध्ये हात असल्याचा दौैंडकर यांचा आरोप आहे. न्यायालयाने 2012 मध्ये या स्कॅमची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बिल्डर निरंजन हिरानंदानी व नगरविकास खात्यातील तत्कालीन आयएएस अधिकारी थॉमस बेंजामिन यांच्यावर फौजदारी संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर 2013 मध्ये लाचलुचपत प्रतिबंध खात्याने या प्रकरणात आरोपींविरोधात पुरेसे पुरावे नसल्याची सांगून हा खटला बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्यास दौंडकर यांनी विरोध केला होता. 

विशेष म्हणजे या पूर्वीच्या अधिकार्‍याने सखोल चौकशी करून आरोपींवर चार्जशीट दाखल करण्याची परवानगी आपल्या वरिष्ठांकडे मागितली होती. परंतु, त्यांना तशी परवानगी देण्याऐवजी हे प्रकरण दुसर्‍या अधिकार्‍याकडे चौकशीसाठी देण्यात आले. या दुसर्‍या अधिकार्‍याने घाईगडबडीत अहवाल तयार केला. तो पहिल्या अधिकार्‍याच्या चौकशीला छेद देणारा असून तो स्वीकारता येणार नाही. तसेच पहिल्या अधिकार्‍याच्या चौकशीतील मुद्दे कसे चुकीचे आहेत, याबाबतही खुलासा केलेला नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.