भिवंडी : वार्ताहर
भिवंडी शहर महापालिका प्रशासनाकडून अवैध बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश पारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवळलेल्या बिल्डर व नगरसेवकांनी जमाव जमवून एका याचिकाकर्त्याच्या कार्यालयावर हल्ला केल्याची घटना शांतीनगर येथे घडली आहे. मोहम्मद सिद्दीक मोमीन (40 रा. शांतीनगर) असे हल्ला झालेल्या याचिकाकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोउनि. एस. एस. सोनावणे करीत आहेत.
मोहम्मद सिद्दीक मोमीन यांनी पिराणी पाडा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या संजिदा अपार्टमेंट या अवैध बांधकाम असलेल्या इमारतीवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने मो. सिद्दीक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून इमारत तोडण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात यावर उच्च न्यायालय सुनावणी घेवून अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश पारित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवळलेल्या बिल्डरांनी संगनमत करून स्थानिक नगरसेवकांच्या साथीने याचिकाकर्ता मो. सिद्दिक मोमीन यांच्या कार्यालयात शिरून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून प्रतिज्ञापत्रावर सही घेण्याचा प्रयत्न केला.
त्यास याचिकाकर्ता मो. सिद्दिक याने विरोध दर्शवल्याने बिल्डर अशफाक हाजी, अजीज हमजा, बिल्डर जिया, सज्जाद, साकिब सरदार आदी अठरा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे.