Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डर आसिफ झोजवाला यांच्या आत्महत्येस पालिकाच जबाबदार

बिल्डर आसिफ झोजवाला यांच्या आत्महत्येस पालिकाच जबाबदार

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:17AMकल्याण : वार्ताहर

कल्याणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांनी सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे. एमसीएचआयच्या (महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री) पदाधिकार्‍यांनी आसिफ झोजवाला यांच्या आत्महत्येसाठी महापालिकेला जबाबदार ठरविले आहे. झोजवाला यांची टिटवाळा येथील एक मालमत्ता सील करून पालिकेने दुसर्‍या मालमत्तेचा काही दिवसांपूर्वी 7 कोटींच्या आसपास थकबाकी असल्यामुळे लिलाव केला होता. तत्पूर्वी आपण पालिकेचे केवळ दीड कोटी देणे लागत असून तशी नव्या आकारणीची बिले धाडावीत, अशी मागणी आसिफ यांनी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन केली होती. मात्र तरीही लिलाव आणि सील प्रकरणात आपली चूक नसताना पालिकेच्या या कृत्यामुळे नाचक्की झाल्याने आसिफ निराश होते. त्यांनी अनेकांना आपली निराशा बोलून दाखविली होती. याच नैराश्येतून झोजवाला यांनी आत्महत्या केल्याचा आरोप एमसीएचआयच्या सदस्यांनी केला आहे. 

झोजवाला हे कल्याण पश्चिमेतील कल्याण-मुरबाड रोडवरील राणी मॅन्शन येथे कुटुंबियांसह राहत होते. आसिफ यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांच्यावर रामबाग येथे अंत्यविधी करण्यात आले. या प्रकरणाची नोंद महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, झोजवाला यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवलेली नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी म. फुले पोलीस तपास करत असले तरी पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाहीत. दरम्यान, झोजवाला यांच्या कुटुंबाने प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला असला तरी एमसीएचआयच्या सदस्यांनी मात्र असिफ यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

25 विकासकांना निराशेने ग्रासले

आ. नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तर, एमसीएचआयचे सदस्य रवी पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे पालिकेच्या मनमानी विरोधात तक्रार केली असून झोजवाला यांच्यासारखे 25 विकासक निराशेने ग्रासल्याचे म्हटले आहे. बांधकाम व्यवसायात आलेली मंदी, अडकून पडलेली गुंतवणूक, बँकांचे वाढणारे व्याज, पालिकेचा ससेमिरा यामुळे सर्वच बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.