Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भायखळ्यामध्ये तरुणाची निर्घृण हत्या

भायखळ्यामध्ये तरुणाची निर्घृण हत्या

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

जीवघेण्या पद्धतीने रस्त्यावर मोटारसायकल रेसिंग करु नका असे सांगणे भायखळ्यातील 23 वर्षीय भावेश कोये या तरुणाच्या जीवावर बेतले आहे. आम्हाला शिकवतोस काय, असे म्हणत मोटारसायकलवरुन आलेल्या 10 ते 12 तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन भावेशला ठार मारल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री भायखळ्यामध्ये घडली. तरुणांच्या हल्ल्यात भावेशच्या मदतीसाठी धावलेले दोघे मित्रसुद्धा जखमी झाले असून भायखळा पोलिसांनी हल्लेखोर आरोपी शैहेजाद शेख यास अटक केली आहे.

भायखळ्यातील राणीबागेजवळ असलेल्या ए. एस. पाटणवाला मार्ग परिसरात भावेश हा कुटूंबासोबत राहात होता. त्याचे वडील मुंबई महानगर पालिकेत फोटोग्राफर म्हणून नोकरी करतात. तर भावेश हा राणीबागेजवळ पे अर्न्ड पार्कचे काम बघत होता. याच परिसरात मोटारसायकल रेसिंग करत असलेल्या तरुणांना त्याने समजावण्याचा प्रयत्न केला होता. आणि याच रागातून 10 ते 12 मोटारसायकलस्वारांनी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला गाठले. आम्हाला समजावतोस काय, असा जाब विचारत या तरुणांनी भावेशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

भावेश मदतीसाठी आरडा-ओरड करत होता. तोपर्यंत या तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. भावेशच्या मदतीसाठी धावलेल्या अवधूत पडवळ आणि राजेश या दोन मित्रांनीही मारहाण करुन या टोळक्याने पळ काढला. 

महत्वाचे म्हणजे भायखळा पोलिसांच्या बीट चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या भायखळा पोलिसांनी जखमी अवस्थेतील भावेशला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.