Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचखोर संजय घरत चुप्पी सोडेना!

लाचखोर संजय घरत चुप्पी सोडेना!

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:22AMकल्याण : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) 8 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईनंतर गेल्या चोवीस तासांत संजय घरतचे तोंड उघडण्यात एसीबीला यश आलेले नाही. घरतच्या मोबाईलला पासवर्ड असून, हे पासवर्ड अद्यापि मिळालेले नसल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. त्यातच शुक्रवारी, तिसर्‍या दिवशी देखील त्याच्या मालमत्तेबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागत नसल्याने संजय घरतच्या चुप्पीसमोर एसीबी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त संजय घरतसह त्याचे स्वीय सचिव व वरिष्ठ लिपिकाला अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. एसीबीच्या अधिकार्‍यांनी लाचखोर अधिकारी संजय घरत याची कसून चौकशी करीत त्याच्याकडील दोन मोबाईल ताब्यात घेतले होते. बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळीपर्यंत कार्यालय, घर व गाड्यांची तब्बल 17 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान घरतचे दोन्ही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र या दोन्ही मोबाईचे पासवर्ड सांगण्यास घरत यांनी नकार दिल्याचे समजते. 

गुरुवारी दुपारी लाचखोर घरतसह त्याचे स्वीय सचिव आमरे व पालिका लिपिक पाटील यांना एसीबीने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर घरत व अन्य दोघांची  एसीबीने ठाणे येथील कार्यालयात रवानगी केली होती. मात्र, बुधवारी ते शुक्रवार दुपारपर्यंत 48 तासांचा कालावधी लोटला तरी घरत यांनी दोन्ही मोबाईलचे पासवर्ड सांगण्यास चुप्पी धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोबाईल पासवर्डअभावी महत्त्वाची कागदपत्रे, त्याचबरोबर संभाषण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.