Sun, Aug 25, 2019 09:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत श्‍वास घेणेही गुन्हा!

मुंबईत श्‍वास घेणेही गुन्हा!

Published On: May 03 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 1:48AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

सर्वात धावपळीचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराची ओळख आता सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणूनही झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत मुंबई चौथ्या स्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल  प्रसिद्ध झाला आहे. मुंबईतील 10 पैकी 9 लोक प्रदूषित हवेने श्वासोच्छवास घेत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. प्रदूषण मापनासाठी पीएम नावाचे परिमाण वापरले जाते. पीएम 2.5 गाठलेल्या भारतातील शहरांची संख्या चौदावर गेली आहे.

या यादीत जगभरातील सर्वात जास्त प्रदूषित 20 शहरांपैकी 14 शहरे भारतातील आहेत. त्यात दिल्ली शहराचा प्रदूषणाच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो तर मुंबई शहराने मागील वर्षीचा आपला पाचवा क्रमांक मागे टाकत आता चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

दिल्ली, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या 4 प्रदूषित शहरांची नावे आहेत. कानपूर, फरिदाबाद, गया, पटना, वाराणसी ही भारतातील प्रमुख प्रदूषित शहरे आहेत. जगातील दर 10 माणसांपैकी 9 लोक प्रदूषित हवेने श्वासोच्छवास करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. शिवाय, दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगभरात 70 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालातून उघड झाली आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Breathing ,  crime,