मुंबई : प्रतिनिधी
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी दुधाचे दर वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले असतानाच आता ब्रेडच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यातच पावाच्या किमती वाढणार असल्याने गरिबांचा नाश्ता महागणार आहे. ब्रेड तयार करणार्या कंपन्यांनी ब्रेडच्या किमती तीन ते चार रुपयांनी वाढवल्या आहेत. तर पावाच्या किमती वाढवण्याचा बेकरी मालकांचा विचार आहे
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईतील विविध स्टोरमध्ये ब्रिटानिया, मॉडर्न आणि विब्स या कंपन्यांचे ब्रेड तीन ते पाच रुपये अधिक देऊन खरेदी करावे लागत आहेत. पूर्वी 400 ग्रॅमच्या ब्रेडसाठी 22 रुपये द्यावे लागत होते. मात्र हाच ब्रेड आता 25 रुपये दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. 800 ग्रॅम वजनाचा ब्रेड पूर्वी 44 रुपयांना मिळत असे, मात्र त्याच्याही किमतीत चार रुपयांनी वाढ होऊन आता त्याच्यासाठी 48 रुपये द्यावे मोजावे लागत आहेत. ब्रेडच्या किमतीपाठोपाठ लवकरच पावाच्या किमती वाढवण्याचा बेकरी मालकांचा विचार आहे. पावाच्या किमती वाढल्या तर मात्र मुंबईकरांचा नाश्ता विशेषत: वडापाव देखील महाग होणार आहे. राज्य सरकारने केलेली प्लास्टिक बंदी आणि मैद्याच्या वाढलेल्या किमती यामुळे ब्रेडच्या किमती वाढल्याचे सांगितले जाते. 50 किलो वजनाच्या मैद्याच्या पिशवीसाठी 1150 रुपये मोजावे लागत होते.
मात्र आता भाववाढ झाल्याने त्यासाठी 1300 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या खर्चाचा भार सहन करण्यापलीकडचा असल्याचे इंडियन बेकरी असोसिएशनच्या जाफरभाई इराणी यांनी सांगितले. ब्रिटानिया कंपनीच्या ब्रेडचे भाव वाढल्यामुळे 2 रुपयांचा भार सामान्यांच्या खिशावर पडत आहे. 400 ग्रॅम ब्रेडवर 3 रुपये आणि 800 ग्रॅमवर 4 रुपये भाववाढ होणार आहे. या भाववाढीसाठी मैद्याचे वाढत असलेले भाव आणि प्लास्टिकबंदी ही मुख्य कारणे आहेत. आता ब्रेड भाववाढीमुळे दाबेली, सँडविच, वडापाव, पावभाजीचीही भाववाढ अटळ आहे. याचा सर्वाधिक फटका रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर जेवणार्या रिक्षा-टॅक्सी चालक, हमाल, माथाडी व बिगारी काम करणार्या नागरिकांना बसणार आहे.
प्लास्टिकबंदी झाल्यामुळे पर्यावरणपूरक पिशव्या वापराव्या लागत आहेत. त्यांच्या किमती अधिक आहेत. शिवाय मैद्याच्या किमतीदेखील वाढल्याने ब्रेडच्या किमती वाढल्याचे बेकर असोसिएशनचे सदस्य सांगतात. लवकरच स्थानिक बेकरीवालेसुद्धा पावाच्या किमती वाढवणार असल्याचे कळते.