Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाळीत आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय

वाळीत आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 12:50AMडहाणू : वार्ताहर

केवळ येशूच्या प्रार्थनेला जातात या किरकोळ कारणावरून पालघर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार घालण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढारीने 11 मार्चला उघडकीस आणली होती. त्याची दखल घेऊन पालघरच्या तहसीलदारांनी यशस्वी मध्यस्ती करून हा वाद मिटवला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या दुर्वेस येथील 5 आदिवासी कुटुंब येशूच्या प्रार्थनेला जातात. त्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या विरोधानंतरही त्यांनी प्रार्थना कायम ठेवल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. याबाबत मनोर पोलिसांनी संबंधित कुटुंबांना गेल्या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही. या कुटुंबांचे पिण्याचे पाणी, रिक्षा वाहतूक तसेच शेतीकडे जाणारे मार्ग बंद केल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत 11 डिसेंबर 2017 रोजी मनोर पोलीस ठाण्यात पहिली तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, या प्रकरणाची पोलिसांनी योग्य दखल न घेतल्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले.

पीडित कुटुंबांना शेतात जाणारी वाट बंद केल्याने रोजीरोटी मिळवणेही मुश्कील झाले आहे. त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्येही बसवले जात नाही. घरातील कोणी मरण पावल्यास गावातील कोणी येत नाही. लहान मुलांनाही टोचून बोलणे, त्यांना मारझोड करणे, पाणवठ्यावर बंदी घालण्यात आल्याने कसे जगायचे, असा सवाल या कुटुंबांना सतावत होता. 

यासंदर्भातील कैफियत पुढारीने सविस्तर मांडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी हा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष दुर्वेसमध्ये जाऊन ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनीधी विष्णू कडव व ग्रामस्थांची बैठक घेऊन गैरसमज दूर करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका घेतली. तसेच शेतीकडे बंद केलेली वाट खुली करून दिली.