Tue, Aug 20, 2019 05:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात स्मशानभूमीतून अस्थी गायब!

उल्हासनगरात स्मशानभूमीतून अस्थी गायब!

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:36AMउल्हासनगर ः वार्ताहर

अंतिम संस्कार करण्यात आलेल्या आपल्या नातलगांच्या अस्थी घेण्यासाठी नातेवाईक गेले असता, तेथील अस्थीच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकारानंतर नातेवाईकांनी एकच गोंधळ घातल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी कामाला लागलेल्या तरुणाने या अस्थी कापडात गुंडाळून ठेवल्याचे समजल्यावर आणि नातेवाईकांना अस्थी मिळाल्यावर येथील वातावरण निवळले.

किशनलाल सचदेव, गुल दरयानी, भगवान बालानी, रामपती शुक्ला या चौघांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर शांतीनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्यांचे नातलग शुक्रवारी विसर्जनासाठी अस्थी घेण्यासाठी गेले असता त्याजागी अस्थीच नव्हत्या. त्यांनी तेथील कर्मचार्‍यांना अस्थींविषयी विचारणा केली असता ते देखील याबाबत अनभिज्ञ होते. यानंतर एकच गदारोळ सुरू झाल्यावर किशनलाल सचदेव यांच्या नातलगाने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन केल्यावर पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. 

शेवटी दोन दिवसांपूर्वी कामावर रुजू झालेल्या तरुणाला बोलावण्यात आले.त्याने या प्रत्येकाच्या अस्थी कापडात भरून आत ठेवल्या होत्या. त्याने कापडातील अस्थी बाहेर आणल्या. मात्र त्यापैकी आमच्या नातलगांच्या कोणत्या? हा प्रश्न पडला. शेवटी त्या उघडण्यात आल्यावर त्यातील वस्तू बघून ही अस्थी आपल्या नातलगाची असल्याची खात्री पटल्यावर त्या नेण्यात आल्या. किशनलाल यांच्या अस्थींची विसर्जनापूर्वी स्मशानभूमीत पूजा करण्यात आली आणि पोलिसांचा जीव देखील त्यामुळे भांड्यात पडला. दरम्यान, पालिकेचे याठिकाणी कार्यालय असून तिथे लिपिक नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.