Fri, Jul 19, 2019 05:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी

मराठा आरक्षणावर १० सप्टेंबर रोजी सुनावणी

Published On: Aug 07 2018 4:08PM | Last Updated: Aug 07 2018 4:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. महाराष्‍ट्र सरकारने आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील प्रगती अहवाल सादर केला. तसेच १५ नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आश्वासन मागासवर्गीय आयोगाने कोर्टाला दिले आहे. मराठा आरक्षावर पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार असल्‍याचे सुचित केले.

राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनाची दखल घेत या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. यावेळी  आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित असल्‍याने त्‍यांना १५ नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

सुनावणी दरम्‍यान, कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी होत असलेल्‍या आत्‍महत्‍यांविषयी चिंता व्यक्‍त करत, आत्‍महत्‍येसारखं टोकाचं पाउल उचलू नका असे आवाहनही  केले आहे. तसेच कोर्टात सुनावणी सुरु आहे, तोपर्यंत आंदोलन करू नका असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली आहे.

दरम्‍यान, सोमवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. तसेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एक तास  चर्चा झाली आहे.