Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:08AMउल्हासनगर : वार्ताहर

कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कन्ट्रोलरुमला आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ खबरदारी घेत डॉग स्क्वॉडला तैनात केले. मात्र, दोन तास डॉग स्क्वॉडने केलेल्या कसून तपासणीनंतर स्थानकात कुठलाही धोका नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि महत्त्वाच्या अनेक रेल्वे स्टेशनवरही सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.  शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास मुंबई कन्ट्रोल रूमला एका निनावी फोनद्वारे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. या फोनची माहिती मिळताच, कल्याण आरपीएफ, जीआरपी तसेच कल्याण शहर पोलीस, बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड पथकाने विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. 

या फोनची दखल घेत रेल्वे स्टेशनवरील सर्व प्रवाशांनाही सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले होते. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध पोलिसांचा फौजफाटा पाहून रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांमध्ये आणि स्टेशनवर येणार्‍या रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.तब्बल दोन तास विविध पोलिसांच्या पथकांनी, बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड पथकांनी रेल्वे स्टेशनचा प्रत्येक कोपरा शोधून काढला. मात्र रेल्वे स्टेशन आणि स्टेशनचा परिसरात कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पूर्णपणे सुरक्षित असल्याने बॉम्बची केवळ अफवा असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.