होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॉलिवूड निर्माता पराग संघवीसह दोघांना समन्स

बॉलिवूड निर्माता पराग संघवीसह दोघांना समन्स

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:08AMठाणे : दिलीप शिंदे

आयपीएल क्रिकेट सामनांवर सट्टा लावल्याप्रकरणी दबंग सलमान खानचा भाऊ अभिनेता-निर्माता अरबाज खान याचा शनिवारी ठाणे खंडणी विरोधी पथकाने जबाब नोंदविला होता. या प्रकरणी आता कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जालान ऊर्फ सोनू मालाड याचा भागीदार आणि सरकार चित्रपटाचा निर्माता पराग संघवी याच्यासह सोनूची गाडी ज्याच्या नावावर आहे त्या समीर बुढ्ढाला सोमवारी ठाणे पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला बोलावले.  

आयपीएल सट्टेबाजी रॅकेटच्या संदर्भात ठाणे  पोलिसांनी समन्स बजावून मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. सट्टेबाजीच्या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली असून आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच एका माजी क्रिकेटपट्टूंचे छायाचित्र जालानसोबत सापडल्याने त्याला चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुख्यात सट्टेबाज आणि दाऊद गँगच्या सट्टा बाजाराचा एक खिलाडी सोनू मालाड याच्याशी पराग संघवीची भागीदारी असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच सोनूकडे सापडलेली गाडीची चौकशी केल्यानंतर ती गाडी समीर बुढ्ढा याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सोनूच्या कुर्कमात या दोघांची भूमिका काय आहे? याचा तपास करण्यासाठी दोघांनाही मंगळवारी बोलावण्यात आल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. बॉलिवूडमधील तीन निर्माते सट्टे लावत असल्याची माहितीही पुढे आल्याने ते दोन निर्माते कोण याकडे सार्‍यांचे लक्ष लागले. 

सोनू, रवी पुजारीवर खंडणीचा गुन्हा

आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी अटकेत असलेल्या बुकी सोनू जालान ऊर्फ सोनू मालाड याच्यावर सोमवारी एका व्यापार्‍याकडून खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. कांदिवली येथील एका व्यापार्‍याकडून गँगस्टार रवी पुजारीच्या मदतीने जबरदस्तीने सुमार अडीच कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि 25 लाखांची रोकड वसुली केल्याप्रकरणी सोनू मालाड याच्यासह गँगस्टार रवी पुजारी, बुकी जुनिअर कलकत्ता, केतन तन्ना, किरण, मुनीर खान या सहा जणांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीमधील हा फ्लॅट सोनू जालानने दुसर्‍याच्या नावाने पॉवर ऑफ अर्टनी करून हडप केल्याचे समोर आले आहे.