Tue, Nov 13, 2018 10:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे महापालिकेचा बॉलिवूड घोळ!

ठाणे महापालिकेचा बॉलिवूड घोळ!

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 1:01AMठाणे : प्रतिनिधी 

ठाणेकरांना शहरातच बॉलिवूडचा अनुभव घेता यावा यासाठी वर्तकनगर परिसरात काम सुरु असलेले बॉलिवूड पार्क आता चांगलेच अडचणीत आले आहे. या पार्कची जागा महापालिकेच्या ताब्यात नसताना तब्बल 20 कोटींची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. तसेच ठेकेदाराला 6 कोटी रूपयांचे बिल दिल्याने सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याने महापौर मीनाक्षी शिंदे यांनी  बॉलिवूड पार्कच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे जाहीर केले.  

अर्धवट अवस्थेतील ते पार्क दारू पिणार्‍यांचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप   शिवसेना नगरसेविका आशा डोंगरे यांनी केला. हाच धागा पकडून उद्यानासाठी जागा आरक्षित नसतानाही त्याठिकाणी  बॉलिवूड पार्क उभारणीसाठी निविदा कशा काढण्यात आल्या, असा प्रश्‍न भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला. ही जागा अंतर्गत वाहतुकीसाठी आरक्षित असताना प्रशासनाने चुकीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर करून लोकप्रतिनिधींची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला. यावर अतिरिक्त आयुक्त संजीव उन्हाळे म्हणाले, बॉलिवूड उद्यानाचे सेट कर्जत येथील स्टुडिओमध्ये तयार केले जात असून त्या कामाची संबंधित अधिकार्‍यांनी पाहाणी करून 6 कोटी रूपयांची बिले अदा केलेली आहेत. त्याचबरोबर उद्यान विभागाने तयार केलेल्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने दोनदा मान्यता दिली असून अंतर्गत वाहतुकीचे काम सुरु असल्याचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी सांगितले. 

प्रशासनाचा हा खुलासा न पटल्याने सभागृहनेते नरेश म्हस्के आणि विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी चौकशी करण्याची मागणी केली. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी  शहरातील शौचालये, पदपथ तसेच अन्य विकासकामांसाठी नगरसेवकांना निधी उपलब्ध होत नसताना अशा कामांवर कोट्यावधी रुपये वाया घालविले जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

संकल्पना : या थीम पार्कमध्ये प्रसिद्ध असलेल्या 9 ते 10 हिंदी चित्रपटांचे सेट उभारण्यात आले आहेत. यामध्ये लगान, ट्रॅफिक सिग्नल, देवदास, लाईट हाऊस, प्रेम रतन धन पायो, अशा काही महत्वाच्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय काही महत्वाच्या हिंदी चित्रपट कलाकारांचे पुतळे देखील उभारण्यात आले आहेत.  उद्यानाना जोडणार्‍या एका पुलाबरोबरच 4 डी थिएटर देखील तयार करण्यात आले आहे. या थिएटरमध्ये एका वेळी 40 लोक बसू शकतात.