Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दंगल गर्ल झायराबरोबर विमानात असभ्य वर्तन (व्हिडिओ)

दंगल गर्ल झायराबरोबर विमानात असभ्य वर्तन (व्हिडिओ)

Published On: Dec 10 2017 8:32AM | Last Updated: Dec 11 2017 1:51AM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री झायरा वसिमसमवेत विमानात छेडछाड झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दिल्‍ली ते मुंबई प्रवासादरम्यान घडलेली ही घटना झायराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून  उघडकीस आणली. याप्रकरणी विकास सतपाल सचदेव याला भादंवि 354 आणि बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली. त्याला सोमवारी दिंडोशी न्यायालयात हजर करणार असल्याचे डीसीपी अनिल कुंभार यांनी सांगितले. 

दरम्यान,  ‘विस्तारा  एअरलाईन्स’ने प्रवास करत असताना मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने तिच्यासोबत असभ्य वर्तन  केल्याचा आरोप झायराने केला आहे. ‘माझ्या मागे बसलेल्या एका वयस्कर माणसाने त्याचा पाय माझ्या खांद्याला लागेल, अशा पद्धतीने माझ्या सीटवर ठेवला. विमान हेलकावे खात असल्याने चुकून त्याचा पाय मला लागत असेल असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, विमानातील दिवे बंद होताच त्याने पुन्हा असभ्य वर्तन सुरू केले. मला झोप लागताच सीटच्या मागून ही व्यक्‍ती माझ्या पाठीला आणि मानेला पाय घासत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी या व्यक्‍तीचा फोटो काढण्याचा प्रयत्नही केला. परंतु, विमानात लाईट कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही,’ असेही झायरा म्हणाली. विशेष म्हणजे या प्रकाराची विमानातील कर्मचार्‍यांकडे तक्रार देऊनही कुणीही मदतीला आले नसल्याचा दावा तिने केला.

दरम्यान, ‘विस्तारा एअरवेज’ने झायरच्या व्हिडीओची दखल घेत या प्रकाराचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने झायराची माफीदेखील मागितली आहे. दुसरीकडे मुंबईत झायरा ज्या हॉटेलमध्ये थांबली, तेथे जाऊन एका महिला पोलिस अधिकार्‍याने तिचा जबाब नोंदवला आहे.