Mon, Sep 24, 2018 13:37



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोगस सनद प्रकरण; दोन सरकारी कर्मचार्‍यांवरही गुन्हा दाखल

बोगस सनद प्रकरण; दोन सरकारी कर्मचार्‍यांवरही गुन्हा दाखल

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 12:59AM



उल्हासनगर : वार्ताहर 

तब्बल 30 कोटींच्या भूखंडाच्या बोगस सनद प्रकरणी उपविभागीय अधिकार्‍यांनी दोन सरकारी कर्मचार्‍यांना डावलून सात भूमाफियांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने आता या प्रकरणात लिपीक पी.आर.गायकवाड आणि ईश्वर पमनानी यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे. 

व्यापारी मोती दुसेजा यांनी 2014 मध्ये घनश्यामदास तुनिया, किशन लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदा लालचंद चावला यांच्याबरोबर मिळून 15 हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी केला. ही मालमत्ता रजिस्टरी करताना या मालमत्तेला सनद नाही, मग रजिस्टरी कशी होऊ शकते, असा प्रश्न दुसेजा यांनी भागीदारांना विचारला असता त्यानी या भूखंडाची बोगस सनद बनवणार असल्याचे सांगितले. 

दुसेजा यांनी या भूखंडाची सनद कशी बनली याचा तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर सचिव यांना तक्रार दिली होती. तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी  शासनाला दिलेल्या अहवालात सनद तपासणीबाबत पुण्याच्या सीआयडी विभागाने सनदांवरच्या स्वाक्षर्‍या ह्या बोगस असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या आदेशाने भूखंडावर दोन महिन्यांपूर्वी फलक ही लावला आहे.

मोती दुसेजा यांनी सांगितले की, या प्रकरणात दोषी आढळलेले लिपीक प्रकाश गायकवाड आणि ईश्वरी पमनानी यांची कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशी चालू आहे.  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने 26 ऑक्टोबर 2017 रोजी बोगस सनद बनविणार्‍या अन्य  दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 10 नोव्हेंबर रोजी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.